लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जळगाव : महापालिका प्रशासनाकडून थकबाकी वसुलीसाठी आता व्यापार्‍यांच्या मालमत्ता गोठविण्याची कारवाई सुरु करण्यात आली असून, बाजार समितीतील १२ दुकाने गोठविण्यात आली आहेत. कारवाई टाळण्यासाठी २४ जणांनी थकबाकीचा तब्बल नऊ लाखांचा भरणा केला.

महापालिका प्रशासनाकडून रहिवासी मालमत्तांशिवाय आता व्यापार्‍यांच्या मालमत्तांवरही कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रभाग समिती क्रमांक तीनअंतर्गत येणार्‍या बाजार समिती परिसरातील ६४ दुकानदारांकडे मालमत्ता करापोटी सुमारे २८ लाख रुपये थकबाकी होती. त्यांना महापालिका प्रशासनाकडून त्या कारणास्तव अधिपत्र बजावण्यात आले होते; परंतु संबंधित ६४ दुकानदारांनी दिलेल्या मुदतीत थकबाकी कराचा भरणा केला नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून प्रभाग अधिकारी एस. एस. पाटील आणि प्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वात प्रत्येकी १० कर्मचार्‍यांची दोन पथके नियुक्त करुन १२ दुकाने गोठविण्यात आली. २४ दुकानदारांनी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी भीतीपोटी आणि ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता थकबाकी करापोटी सुमारे नऊ लाखांचा भरणा केला.

आणखी वाचा-निवडणूक वर्षात निधीसाठी धडपड, नाशिक जिल्हा वार्षिक योजनेत ६०० कोटींची वाढीव मागणी

दरम्यान, बाजार समितीत ८५० गाळे असून, पैकी तीन-चार वर्षांपासून थकबाकीदार असलेल्या ६४ दुकानदारांची यादी तयार करण्यात आली आहे. अभय दंड माफी योजनेचा प्रशासनाकडून लाभ दिल्यानंतरही थकबाकी करांचा भरणा केलेला नाही, अशा मालमत्ताधारकांवर महापालिका प्रशासन यापुढे मालमत्ता जप्तीची कारवाई सुरूच ठेवणार आहे. थकबाकी कराचा भरणा त्वरित करून मालमत्ता जप्तीची कारवाई टाळावी आणि प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड, उपायुक्त निर्मला गायकवाड व सहआयुक्त गणेश चाटे यांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon municipal corporations property confiscation campaign against defaulters mrj