लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जळगाव: शहरासह विविध उपनगरातील मुख्य रस्त्यांसह फुले व्यापारी संकुल, तसेच चौकाचौकांत वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या वेगवेगळ्या वस्तू, फळे-भाजीपाला विक्रेत्यांच्या १५ ते २० टपर्‍यांसह ३५ ते ४० हातगाड्या जप्त करण्यात आल्या. पिंप्राळा उपनगरात कर्मचारी व विक्रेत्या महिलांमध्ये वाद झाला. अधिकार्‍यांनी समज दिली. मात्र, नाशवंत असलेल्या फळांसह भाजीपाला परत करण्यात आला. यामुळे कारवाईमुळे महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग पुन्हा सक्रिय झाला आहे. अतिक्रमण निर्मूलन मोहीम नियमित सुरू राहणार आहे.

शहरात मुख्य रस्त्यांसह चौकाचौकांना अतिक्रमणाने विळखा घातला होता. वाहतुकीसही अडथळा होत होता. फेरीवाल्यांनी पदपथांसह रस्तेही अडविल्याने महापालिका अतिक्रमण निर्मूलन विभागातर्फे पदफेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई हाती घेण्यात आली असून, त्यासाठी विभागातर्फे उपायुक्त गणेश चाटे, विभागप्रमुख संजय ठाकूर, उमाकांत नश्ते, साजीद अली, संजय पाटील, सतीश ठाकरे यांच्या नेतृत्वात चार पथके नियुक्त करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात १२ ते १५ कर्मचारी आहेत. त्यात आता महिला कर्मचार्‍यांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी दहापासूनच शहरातील फुले व्यापारी संकुल, महामार्गालगतचा महाराणा प्रतापसिंह महाराज चौक, पिंप्राळा उपनगरातील गजबजलेला मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौक, गणेश कॉलनी रस्ता, ख्वाजामियाँ दर्गा चौक यांसह विविध भागांतील चौकांमध्ये, रस्त्यांवर आदी ठिकाणच्या वाहतुकीस अडथळा ठरणार्‍या वस्तू, फळांसह भाजीपाला विक्रेत्यांच्या ३५ ते ४० हातगाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. फेरीवाल्यांचे अनधिकृत स्टॉल्ससह साहित्य हटवून पदपथ मोकळे करीत एकप्रकारची सौंदर्यात बाधा आणणारी जळमटे दूर करण्याचा प्रयत्न केला. शिवाय, रस्त्यांवरील वाहतुकीनेही मोकळा श्‍वास घेतला.

आणखी वाचा-नाशिक : सात महिन्यात सापळ्यांचे शतक; शासकीय कार्यालयांत लाचखोरीचा चढता आलेख

पिंप्राळा उपनगरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्याच्या मधोमध बसलेल्या, तसेच दुतर्फा बसलेल्या पूजा-साहित्य, फळे, भाजीपाला, संसारोपयोगी वस्तू विक्रेत्यांच्या पाच-सहा हातगाड्यांसह तीन टपर्‍या आदी साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे विक्रेत्या महिला व अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकातील कर्मचार्‍यांमध्ये वाद झाला. तो सुमारे तासभर सुरू होता. त्यानंतर अधिकार्‍यांनी समज दिली. विभागप्रमुख संजय ठाकूर यांनी सांगितले की, अतिक्रमणधारकांना पाच-सहा दिवस अगोदर नोटिसाही बजावल्या होत्या. त्यानंतर त्यांना समजूनही सांगण्यात आले होते. अखेर मंगळवारी विक्रेत्यांच्या हातगाड्यांसह टपर्‍या जप्त करण्यात आल्या. ही मोहीम नियमित सुरूच राहणार आहे. मोहीम सकाळी दहा ते रात्री आठपर्यंत राबविली जाते. आतापर्यंत मोहिमेत जप्त केलेल्या हातगाड्यांसह इतर साहित्य चोरीला जाऊ नये यासाठी बालगंधर्व नाट्यगृहाजवळील गोदामात ठेवण्यात आले आहे. सुमारे शंभरावर विक्रेत्यांचे ते साहित्य आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon municipal encroachment removal department reactivated mrj
Show comments