जळगाव – चोपडा तालुक्यातील मध्य प्रदेश सीमेजवळ असलेल्या उमर्टी गावात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. अवैध बंदूक विक्रीविरोधात कारवाई करताना पोलिसांना या परिस्थितीला सामोरे जावे लागले. हल्लेखोरांनी एका पोलिसाला बांधून ठेवले होते, त्याची सुटका रात्री उशिरा करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक आणि तीन कर्मचारी उमर्टी गावाजवळ छापा टाकण्यासाठी गेले होते. कारवाईदरम्यान, एका संशयिताला ताब्यात घेऊन ते परत येत असताना स्थानिक गुन्हेगारांनी त्यांना अडवले. वाद वाढल्यानंतर हल्लेखोरांनी एका पोलीस कर्मचाऱ्यास ताब्यात घेत उर्वरित कर्मचाऱ्यांना मारहाण केली.

घटनेची माहिती मिळताच चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात खळबळ उडाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ मदत पथक पाठवले. जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी स्वतः घटनास्थळी रवाना झाले. मध्य प्रदेश पोलिसांच्या सहकार्याने रात्री नऊच्या सुमारास ओलीस ठेवलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची सुटका करण्यात आली. पोलीस कर्मचारी तीन तास गुन्हेगारांच्या ताब्यात होता.  याप्रकरणी एका संशयिताला अटक करून इतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत. पुढील कारवाईसाठी दोन्ही राज्यांच्या पोलिसांनी समन्वय साधला आहे.

उमर्टी या गावात गावठी बंदुका तयार केल्या जातात. महाराष्ट्रात या गावठी बंदुकींची अवैधपणे विक्री केली जात असल्याचे सांगण्यात येते. उमर्टी येथे एका जुन्या वादातील संशयित पप्पीसिंग शिकलगर यास अटक करण्यासाठी चोपडा येथील सहायक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवरे यांच्या नेतृत्वाखाली शशिकांत पारधी, दीपक शिंदे,चेतन महाजन, विशाल पाटील, किरण पारधी हे सायंकाळी उमर्टी गावात जात असताना अनेर नदीच्या पुलावर स्थानिक आणि पोलिसांमध्ये संशयितास ताब्यात घेण्यावरुन वाद झाला. जमावाने पोलिसांवर हल्ला केला. शशिकांत पारधी यांना ताब्यात घेत इतर पोलिसांना मारहाण केली. त्यानंतर चोपडा पोलीस मदतीला आले.