जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात बुधवारी झालेल्या रेल्वे अपघातातील १३ मृतांपैकी १२ जणांची ओळख पटली आहे. त्यापैकी सात जण हे मूळ नेपाळमधील तर इतर उत्तर प्रदेशातील रहिवासी आहेत. सात मृतदेहांची ओळख बुधवारीच पटली होती. उर्वरित मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी प्रशासनाने डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला असतानाच, संबंधितांचे नातेवाईक गुरूवारी जळगावमध्ये आले. आणि त्यांनी सहापैकी पाच मृतदेह ओळखले. एका मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही.

मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावर जळगाव जिल्ह्यातील माहेजी ते परधाडे स्थानकांदरम्यान बुधवारी लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसच्या एका डब्यात आग लागल्याची अफवा पसरली. प्रवाशांनी चैन ओढत गाडी थांबवून समोरच्या रुळावर उड्या मारल्या. त्याचवेळी भुसावळकडे जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसखाली सापडून १२ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर काही प्रवासी जखमी झाले.

ओळख न पटलेल्या मृतांच्या नातेवाईकांनी अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गुरूवारी जळगाव गाठून आपापल्या नातेवाईकांना शरीरयष्टी व कपड्यांवरून ओळखले. त्यामुळे डीएनए चाचणीची वेळ आली नाही. नातेवाईकांच्या ताब्यात दिलेले सर्व मृतदेह सायंकाळी खासगी रुग्णवाहिकांमधून उत्तर प्रदेश आणि नेपाळकडे रवाना करण्यात आले. नेपाळमधील सर्व मृतदेह आधी रेल्वेने पाठवण्याचे ठरले होते. मात्र, संबंधितांच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकांची मागणी केली. रुग्णवाहिकांचा सर्व खर्च रेल्वे प्रशासन करणार असल्याचे तहसीलदार शीतल राजपूत यांनी सांगितले. दूरचा प्रवास लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून सर्व मृतदेहांवर शवविच्छेदनानंतर लगेचच रासायनिक प्रक्रिया करण्यात आल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली. मंत्री गिरीश महाजन यांनी गुरूवारी दुपारी वैद्यकीय महाविद्यालयास भेट देऊन जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांची विचारपूस केली.

ओळख पटलेल्या मृतांची नावे

ओळख पटलेल्या मृतांमध्ये जवकलाबाई जयगडी (६०), कमला भंडारी (४२), लच्छीराम पासी (४०), नंदराम विश्वकर्मा (४५), मैसारा विश्वकर्मा (४२), हिमू विश्वकर्मा (११), राधेश्याम अग्रवाल (२८) या मूळ नेपाळमधील रहिवाशांचा समावेश आहे. हे सर्वजण मुंबई, पुणे, ठाणे येथे कामानिमित्त सध्या वास्तव्यास होते. याशिवाय इतर मृतांमध्ये इम्तियाज अली (३५), महेश गुरदीम (३२), शिवकुमार चव्हाण (४०), नसरूद्दीन सिद्दीकी (१८) आणि बाबू खान (२७) या मूळ उत्तर प्रदेशातील रहिवाशांचा समावेश आहे. सर्वजण मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास होते.

Story img Loader