जळगाव – राज्यात तापमानाचा पारा चांगलाच चढला असून, जिल्ह्यात सर्वाधिक तापमान नोंदविले जात आहे. शहरासह जिल्ह्यात गेल्या पाच-सहा दिवसांपासून तापमानात चढ-उतार होत होता. राजस्थानमार्गे उष्ण वाऱ्यांचा वेग वाढू लागल्याने जळगाव शहरासह जिल्ह्यात उष्णतेची लाट आली आहे. परिणामी रविवारी जळगावचे किमान तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वारे यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. मात्र, यामुळे एप्रिल काही प्रमाणात सुसह्यही झाला होता. आता मेच्या पहिल्याच आठवड्यात सूर्य आग ओकू लागला आहे. सहा मेनंतर वातावरणात बदल होऊन तापमानाचा पारा दिवसागणिक वाढत आहे. उन्हाच्या कडाक्याने कहर केला असून, तापमानाचा पारा चढताच राहिला आहे. याअनुषंगाने आता पुढे महिनाभर उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. रविवारी किमान तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. गेल्या चार दिवसांत कमाल तापमानाची विक्रमी नोंद झाली आहे. केवळ आठवडाभरात कमाल तापमानातील फरक सात ते आठ अंश सेल्सिअसवर पोहोचला असून, त्यामुळे जळगावकर या उष्म्यात अक्षरश: होरपळून निघत आहेत.

हेही वाचा – संजय राऊत यांच्याविरुध्द गुन्हा, आदेश न पाळण्याचे आवाहन महागात

जळगावसह जिल्ह्यातील शहरांचे गेल्या आठवड्यापासून तापमान ४३ ते ४४.९ अंश सेल्सिअस नोंदले जात आहे. शुक्रवारी किमान तापमान ४४.९ अंश सेल्सिअसवर, तर शनिवारी जळगावचे कमाल तापमान ४५ अंश सेल्सिअस नोंदले गेले. भुसावळ, वरणगाव, चोपडा या शहरांमध्येही कमाल तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. दुपारी सव्वातीन ते पावणेचार या वेळेत सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याचे हवामानतज्ज्ञांनी सांगितले. आता जळगावकरांनी उन्हाचा धसका घेतला असून, उष्णता तापदायक ठरत असल्याने लग्नसराईच्या उपस्थितीवर परिणाम होत आहे. शहरासह जिल्ह्यातील रस्ते निर्मनुष्य होत असल्याचे चित्र आहे. महामार्गावरील वाहतूकही दुपारी थांबलेली दिसते. मालमोटारींचे चालकदेखील महामार्गालगतच्या झाडांचा आसरा घेतलेले दिसून येतात. पक्ष्यांवरही परिणाम झाला आहे. उष्माघातापासून काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

हेही वाचा – उन्हाच्या दाहकतेमुळे नाशिकच्या चांदीच्या गणपतीला चंदनाचा लेप

अशी घ्या काळजी

दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, दुपारी स्वयंपाक करणे टाळावे, स्वयंपाकावेळी दरवाजे-खिडक्या उघड्या ठेवाव्यात, जेणेकरून स्वयंपाकघरात हवा खेळती राहील. उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळावीत. अनवाणी उन्हात चालू नये. लहान मुलांना व पाळीव प्राण्यांना आतमध्ये ठेवून गाडी बंद करू नये. चहा, कॉफी, मद्य, खूप साखर असलेली व कार्बोनेडेट द्रव्याचे सेवन टाळावे. प्रथिनांची अधिक मात्रा असलेले पदार्थ तसेच शिळे अन्न टाळावे. सैलसर व सुती कपडे शक्यतो पांढरे कपडे वापरावेत, डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon recorded a minimum temperature of 45 degrees celsius on sunday ssb
Show comments