जळगाव : येथील एल. एच. पाटील इंग्लिश मीडिअम स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनी कलश भय्याची टोरंटो विद्यापीठाने पिअरसन आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्तीसाठी निवड केली आहे. भारतातून फक्त तीन विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. पिअरसन शिष्यवृत्ती अत्यंत प्रतिष्ठित समजली जाते. बारावी विज्ञाननंतर कलश आता कॅनडा येथे चार वर्षे संगणक अभियांत्रिकीचे उच्चशिक्षण घेऊन संशोधन करणार आहे. शिष्यवृत्ती अंतर्गत कलशला टोरंटो विद्यापीठातर्फे चार वर्षे निवास, भोजन, शैक्षणिक शुल्क, पाठ्यपुस्तके यांसह इतर सर्व सोयी-सुविधा मोफत दिल्या जाणार आहेत. भारतीय चलनात चार वर्षांचा हा खर्च सुमारे अडीच कोटी रुपये इतका असेल, अशी माहिती तिचे वडील वास्तुविशारद पंकज भय्या यांनी दिली.
हेही वाचा : लम्पी आजाराचा पुन्हा फैलाव? जळगाव, धुळे जिल्ह्यात जनावरांचे आठवडे बाजार बंद
करोना काळापासून कलश आणि तिचा लहान भाऊ देवेश हे त्यांच्या विविध राज्यांतील मित्रांच्या सहकार्याने फ्लाय अर्थात फन लर्निंग यूथ या संस्थेद्वारे वंचित मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करीत आहेत. या कार्यासाठी कलश हिला अमेरिकेतील जॉर्ज बुश पॉइंट्स ऑफ लाइट या संस्थेने सन्मानित केले आहे. अशोका यंग चेंज मेकर्स या आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारानेही कलश हिला गौरविले गेले आहे. अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महिला संघटनेतर्फे किशोरी प्रतिभा सन्मान पुरस्काराने तिचा गौरव करण्यात आला. या शिष्यवृत्तीसाठी कलश हिला शाळेचे तसेच वडील पंकज भय्या, आई इंटेरिअर डिझाइनर पल्लवी भय्या यांचे मार्गदर्शन लाभले.