जळगाव: जिशानने आई शमीमला रशियातून दूरदृश्यप्रणालीव्दारे संपर्क साधला तेव्हा भारतात रात्रीचे सव्वाअकरा वाजले होते. आतेबहीण जिया कशी नदीत गुडघाभर पाण्यात उतरली आहे, हे तो आनंदाने आईला दाखवित होता. त्यावेळी आईने जिशानला लवकर पाण्याबाहेर पडण्यास सांगितले. त्यानेही लगेच आम्ही घरी जात असल्याचा लघुसंदेश व्हॉटसअॅपवर पाठविला. परंतु, त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात होत्याचे नव्हते झाले. जिया, जिशानसह जळगाव जिल्ह्यातील हर्षल देसले आणि मुंबईतील एक जण असे चौघे वाहून गेले. त्यापैकी हर्षलचा मृतदेह सापडला असून इतर तिघांच्या मृतदेहांचा शोध सुरु आहे. रशियातील यारोस्लाव-द-वाइज नोव्हगोरोड स्टेट युनिव्हर्सिटी परिसरात मंगळवारी ही घटना घडली. या विद्यापीठात जळगाव जिल्ह्यातील हर्षल देसले (१९, रा. भडगाव), जिशान पिंजारी (२०), जिया पिंजारी (२०, दोन्ही रा. इस्लामपुरा, अमळनेर), गुलाम मलिक (मुंबई) हे वैद्यकीय शिक्षण घेत होते.
मंगळवारी सायंकाळी हे सर्व काही मित्रांसह विद्यापीठाजवळील वोल्खोव्ह नदीकिनारी फिरायला गेले. ते नदीतही उतरले. नेहमीप्रमाणे जिशानचे आई शमीमशी दूरदृश्यप्रणालीव्दारे बोलणेही झाले. शमीम यांनी जिशानला लवकर पाण्याबाहेर पडण्याचा सल्ला दिला. त्यानंतर अवघ्या १५ मिनिटात नदीला पूर आला आणि क्षणात पाण्यात उतरलेले विद्यार्थी वाहून गेले. उपस्थितांनी काही जणांना वाचविण्याचा प्रयत्न केला. त्यात निशा सोनवणे या विद्यार्थिनीला वाचविण्यात यश आले. परंतु, जिशान, जिया, हर्षल आणि गुलाम हे बेपत्ता झाले. बचाव दलास हर्षलचा मृतदेह मिळाला. रात्री दोनच्या सुमारास जिशानचे वडील अशपाक पिंजारी यांना रशियातील नातेवाईकांनी संबंधित घटनेविषयी कळविले. जिशान आणि जिया हे दोन्ही अमळनेर येथील सेंट मेरी शाळेचे विद्यार्थी होते. अशपाक पिंजारी यांचा मुलगा जिशान आणि बहिणीची मुलगी जिया या दोघांना गेल्या वर्षी जुलैत एमबीबीएसच्या शिक्षणासाठी रशियाला वेलिकी नोवगोरोद शहरात रवाना केले होते. जिशानला एक बहीण आहे, तर जियाला एक भाऊ आहे. अशपाक पिंजारी शेतकरी आहेत.
हेही वाचा : येवल्याजवळील अपघातात चालकाचा मृत्यू, सात प्रवासी जखमी
हर्षल देसले याच्या घरी विद्यापीठाकडून निरोप देण्यात आला. हर्षल हा सहा महिन्यांपूर्वीच रशियात एमबीबीएसच्या शिक्षणासाठी गेला होता. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याने घरी संपर्क साधला होता. त्यानंतर सकाळी त्याच्याशी कुटुंबियांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा भ्रमणध्वनी संच बंद होता. त्यामुळे कुटुंबियांनी रशियातील प्राचार्यांशी संपर्क साधला. त्यांनी घडलेला प्रकार सांगितला. हर्षल हा आईवडिलांचा एकुलता मुलगा होता. त्याचे वडील संजय पाटील- देसले यांचा वीटभट्टीचा व्यवसाय असून, आई गृहिणी आहे. हर्षलला एक बहीण आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी रशियातील दूतावासातील कुमार गौरव या अधिकाऱ्यांशी संपर्क करून सर्व माहिती जाणून घेतली. अमळनेरचे प्रांताधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांनी पिंजारी कुटुंबियांचे सांत्वन केले. मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी प्रशासनाशी संपर्क करून मदतीत कोणतीही अडचण येऊ नये, अशा सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा : त्र्यंबकेश्वरमध्ये तलावात बुडून दोन मुलींचा मृत्यू
रशियातील सरकारसह केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन पथकाने दुर्घटनेला गांभीर्याने घेतले असून यंत्रणेकडून विद्यार्थ्यांचा शोध घेतला जात आहे. भारतीय दूतावासातील अधिकार्यांनी माझ्याशी संपर्क साधून सर्व माहिती दिली. पहिल्या दिवशी एका विद्यार्थ्याचा मृतदेह मिळून आला होता. शुक्रवारी आणखी एका विद्यार्थ्याचा मृतदेह मिळून आला. रशियन सरकारकडून मृतदेह पाठविण्यासाठी कायदेशीर प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, जळगाव)