जळगाव : दिवाळी सण संपल्याने मोठ्या शहरांतून गावाकडे आलेल्या माहेरवाशिणींसह चाकरमान्यांसह विद्यार्थी परतीचा प्रवास करु लागले आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळासह खासगी प्रवासी बस पूर्णक्षमतेने वाहतूक करत आहेत. त्याचाच गैरफायदा खासगी बस कंपन्यां घेत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुपथकाने केलेल्या कारवाईतून निष्पन्न झाले. पथकाने तीन खासगी बस जप्तीची कारवाई करुन त्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या आवारात जमा केल्या.
दिवाळीची धामधूम आता संपली असल्याने मुंबई, पुणे, सुरत या शहरांकडे जाणाऱ्या रेल्वे व महामंडळाच्या बस पूर्णक्षमतेने भरलेल्या दिसून येत आहेत. रेल्वेला आरक्षण न मिळाल्याने खासगी बसमधून प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी मोटारवाहन निरीक्षक नितीन सावंत, गणेश लवाटे, नूतन झांबरे यांचे वायुपथक नियुक्त केले आहे. पथकाकडून महामार्गासह विविध भागांत पाहणी करुन खासगी बसची तपासणी केली जात आहे. दिवाळी संपल्यामुळे आता गावाकडे आलेले पुन्हा परतीचा प्रवास करत आहेत.
हेही वाचा : तोरणमाळमध्ये वैविध्यपूर्ण पर्यटनाच्या संधी, आदिवासी महोत्सवात डाॅ. विजयकुमार गावित यांचे प्रतिपादन
प्रवाशांची गर्दी लक्षात घेता, खासगी बस कंपन्यांकडून आता अव्वाच्या सव्वा भाडे आकारणी केली जात आहे. जळगाव- मुंबई, जळगाव- पुणे यासाठी यासाठी दोन हजारांवर भाडे आकारणी केली जात आहे. शिवाय, खासगी बस कंपन्यांकडून प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता, आर्थिक फायदा होण्यासाठी नियमांना धाब्यावर बसवून खासगी बसची बांधणी करण्यात आली आहे. या खासगी बसवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालायच्या वायुपथकाने कारवाई केली आहे.
हेही वाचा : चबुतऱ्याचे काम न झाल्यास आंदोलन; धुळ्यात छत्रपती संभाजीराजे पुतळा समितीचा इशारा
खासगी बसची लांबी १२.५० मीटर आवश्यक आहे. मात्र, ती यापेक्षाही अधिक असल्याचे दिसून आले. ३० ते ३६ क्षमतेपेक्षा अधिक म्हणजे ५९ प्रवासी बसमध्ये आढळून आले. असे अनेक नियम खासगी प्रवासी बस कंपन्यांकडून होत असल्याचे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाच्या कारवाईतून निष्पन्न झाले असून, तीन खासगी बस जप्त करुन त्या कार्यालय आवारात जमा करण्यात आल्याची माहिती उप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी आर. डी. निमसे यांनी दिली.