जळगाव – मध्य रेल्वेच्या भुसावळ-मुंबई मार्गावर जळगाव जिल्ह्यातील पाचोऱ्याजवळ बुधवारी झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांची संख्या १३ झाली आहे. त्यापैकी सात प्रवाशांची ओळख पटली असून ओळख न पटलेल्या उर्वरित सहा मृतदेहांची आता डीएनए चाचणी केली जाणार आहे.लखनऊ-मुंबई पुष्पक एक्स्प्रेसच्या एका डब्यात बुधवारी सायंकाळी आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर घाबरलेल्या प्रवाशांनी जीव वाचविण्यासाठी समोरच्या रूळावर उड्या घेतल्या होत्या. त्याचवेळी विरूद्ध दिशेने आलेल्या कर्नाटक एक्स्प्रेसच्या धडकेने १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. रेल्वे अपघातातील मृतांपैकी काहींचे जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात बुधवारी रात्री उशिरा शवविच्छेदन करण्यात आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृतांमध्ये आठ पुरूष, चार महिला आणि ११ वर्षीय मुलाचा समावेश आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बुधवारी रात्री उशिरा दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये कमला भंडारी (४३), लच्छीराम पासी (४०), हिमू विश्वकर्मा (११), जवकलाबाई जयकडी (६०) या नेपाळमधील चार प्रवाशांचा तसेच इम्तियाज अली (३५), नसरूद्दीन सिद्दीकी (१९), बाबू खान (२७) या उत्तर प्रदेशातील तीन प्रवाशांचा समावेश आहे. यापैकी कमला भंडारी या मूळ नेपाळच्या रहिवासी सध्या मुंबईत राहत होत्या. ओळख पटलेले मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाईकांच्या स्वाधीन करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.  ओळख न पटलेल्या मृतदेहांची त्यांच्या डीएनए चाचणी केली जाणार आहे. पाचोरा, जळगावमधील रुग्णालयांमध्ये दाखल जखमींपैकी चार जणांना गंभीर दुखापत झाली असून, इतर प्रवासी किरकोळ जखमी आहेत. उजाला सावंत (३८), दीपक थापा (१८), धर्मा सावंत (आठ), मंजू परिहार (२५) या नेपाळमधील चार प्रवाशांचा तसेच अबू मोहंमद (३०), हकीम अन्सारी (४५), हसन अली (१९), विजयकुमार गौतम (३३), उत्तम हरजन (२५), मोहंमद निब्बर (३१) या उत्तर प्रदेशातील सहा प्रवाशांचा जखमींमध्ये समावेश आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jalgaon train accident government to conduct dna test of six bodies to identify victim passengers identity zws