Girish Mahajan in Jamner Vidhan Sabha Election 2024 : जामनेर हे जळगाव जिल्ह्यातील शहर आणि तालुका असून खानदेश प्रदेशाचा भाग आहे. जळगाव शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेले हे शहर गिरणा नदीच्या काठावर आहे. जामनेरला समृद्ध सांस्कृतिक वारसा असून शहराला मोठा इतिहास आहे. मध्ययुगात हे शहर व्यापार आणि वाणिज्याचे केंद्र होते. मराठा साम्राज्यात या शहराने महत्त्वाची भूमिका बजावली होती. सातवाहन, राष्ट्रकूट, चालुक्या आणि मुघलांसह अनेक राजवंशांनी येथे राज्य केले होते. मुघलांनी १६ व्या शतकात निर्माण केलेला जामनेर किल्ला हा शहरातील अनेक ऐतिहासिक स्थळांपैकी एक आहे. अशा या ऐतिहासिक वारसा लाभलेल्या जामनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजप नेते गिरीश महाजन करतात. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी गिरीश महाजन यांना भाजपकडून उमेदवारी मिळाली आहे. त्यांच्यासमोर कोणाचे आव्हान आहे ? याबाबत जाणून घेऊया.
१९९६ पासून गिरीश महाजन जामनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. गिरीश महाजन यांचा जन्म जामनेर येथे झाला होता. महाजन हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून विद्यमान महायुती सरकारमध्ये ते ग्रामविकास मंत्री आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थी असताना गिरीश महाजन हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (एबीव्हीपी) १९७८ साली सदस्य होते. एबीव्हीपीमध्ये असताना त्यांनी कार्यकर्ता म्हणून राजकारण्यांसाठी प्रचार पोस्टर्स वितरित केले. ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील भारतीय जनता युवा मोर्चाचे ते तालुकाध्यक्ष बनले आणि तेथून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली.
हेही वाचा – History of exit polls: भारतातील मतदानोत्तर चाचण्यांची (एग्झिट पोल) सुरुवात कधी झाली?
भाजपमधील प्रभावी नेता
गिरीश महाजन हे भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जातात. २०१६ पर्यंत खानदेशातील प्रभावी चेहरा अशी ओळख असलेले एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये दबदबा होता. मात्र २०१६ मध्ये खडसेंवर मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचे आरोप झाले होते. त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली. भाजपमध्ये ते प्रभावी नेते म्हणून स्थावर झाले. एकनाथ खडसे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात असून त्यांच्यात आणि महाजन यांच्यात खटके उडतच असतात.
अशी आहे कारकीर्द
१९९२ साली जामनेरच्या ग्रामपंचायत निवडणुकीत महाजन निवडून आले. १९९५ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेले. तेव्हापासून १९९९, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजयाची घोडदौड कायम राखली आहे. आपल्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी जलसंपदा मंत्री, ग्रामविकास मंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री या पदांवर काम केले आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही ते निवडून येतात का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – उमेदवारी देताना ‘लाडकी बहीण’ नावडती
गिरीश महाजन यांच्यासमोर कोणती आव्हाने?
२०१९ च्या निवडणुकीत १ लाखांवर मते घेऊन गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या संजय गारूड यांचा पराभव केला होता. गारुड यांना ७९ हजार ७०० मते मिळाली होती. गारुड यांनी अनेकवेळा जामनेर येथून महाजन यांना आव्हान दिले आहे. मात्र आता ते भाजपमध्ये आहेत. गारुड यांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला मोठा फटका मानला जातो. भाजपमध्ये अनेक वर्षे राहिलेले, तसेच जळगाव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप खोडपे यांनी तुतारी हाती घेतली. खोडपे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून जामनेर मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आहे. खोडपे हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र यंदाच्या निवडणुकीत खोडपे यांनी गिरीश महाजनांविरोधात दंड थोपटले आहेत.