आरक्षणाची मागणी योग्य असली तरी हरियाणात काही असामाजिक तत्वांनी आंदोलन पेटविले असल्याचा आरोप रविवारी येथे आयोजित जाट समाजाच्या १४ व्या राष्ट्रीय बौध्दिक संमेलनावेळी करण्यात आला. तर, आरक्षणासाठी महाराष्ट्रातही आंदोलन करण्यात येईल, असा इशारा समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष शांताराम लठार यांनी दिला.
गिरणारेजवळील जी. पी. फार्म येथे आयोजित या संमेलनास देशभरातील जाट समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते. आरक्षणाचा आणि या संमेलनाचा कोणताही संबंध नसून संमेलनात समाजासमोरील समस्यांवर केवळ विचार मंथन करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, माध्यमांशी बोलताना समाजाच्या नेत्यांनी आरक्षणाची भूमिका कशी योग्य आहे हे नमूद केले. अखिल भारतीय जाट समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजय सिंग यांनी जाट समाजाने राष्ट्रीय विकास कार्यात दिलेल्या योगदानांचा उल्लेख करत समाजाकडून करण्यात येत असलेली आरक्षणाची मागणी योग्यच असल्याचे नमूद केले. समाजाने देशासाठी सामाजिक, आर्थिक, संरक्षण, सांस्कृतिक यासह इतर सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण भूमिका बजावली असतानाही त्यांना योग्य तो न्याय मिळालेला नाही. ज्येष्ठ नेते व माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यापासून भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी वेळोवेळी जाट समाजाच्या आरक्षणविषयक मुद्यास समर्थन दिले आहे. जाट समाज हा शांतताप्रिय आहे. हरियाणात आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात काही असामाजिक तत्त्वांनी सहभाग घेतला असून त्यांच्याकडूनच हिंसक घटना घडविल्या जात असल्याचा आरोपही सिंग यांनी केला. यावेळी लठार यांनीही आरक्षण समर्थनार्थ भूमिका मांडली. जाट समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रातही आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. संमेलनास ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र उपस्थित राहणार असल्याचे प्रारंभी सांगण्यात आले होते. परंतु, शेवटपर्यंत ते आलेच नाहीत. यावेळी दिलीपसिंह बेनिवाल, इंद्रजित आर्य यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader