लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : धुळे येथील जवाहर गटाच्या वेगवेगळ्या तीन संस्थांकडे मालमत्ताकराच्या दंडासह तब्बल सात कोटीची थकबाकी झाल्याने अखेर धुळे महापालिकेच्या जप्ती पथकाने शहरातील जवाहर वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांचे कार्यालय गोठविले. आमदार कुणाल पाटील यांनी कारवाई बेकायदेशीर असून या संदर्भात महापालिकेविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे.

धुळे महापालिकेच्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या आदेशावरून थकबाकीधारकांना कारवाईपूर्व नोटीस बजावण्यात आल्या आहेत. मालमत्ता कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात असल्याने अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे, उपायुक्त शोभा बाविस्कर, सहायक आयुक्त स्वलिया मालगावे या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका अधीक्षक शिरीष जाधव यांच्या नेतृत्वाखाली जप्ती पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात वसुली अधीक्षक मधुकर निकुंभ, निरीक्षक मनोज चीलंदे, मनिष ठाकरे यांचा समावेश आहे. पथकाच्या अधिकाऱ्यांनी आपला मोर्चा जवाहर वैद्यकीय महाविद्यालय, दंत महाविद्यालय आणि जवाहर सहकारी शेतकरी सूतगिरणीकडे वळवला. या तीनही संस्थांकडे मालमत्ता करापोटी जवळपास सात कोटी रुपयांची थकबाकी आहे. अनेकदा नोटीस बजावूनही या संस्थांनी त्यांच्याकडील थकीत रक्कम न भरल्याने अखेर महापालिका प्रशासनाला मालमत्ता गोठविण्यासारख्या कठोर कारवाईचा बडगा उगारावा लागला.

दरम्यान, सूतगिरणीचे अध्यक्ष तथा माजी आमदार कुणाल पाटील यांनी महापालिकेच्या या कारवाईवर तीव्र आक्षेप घेतला. मुळात महापालिकेने अवास्तव मालमत्ता कर आकारला आहे. याविरोधात न्यायालयात न्याय मागण्यात आल्याने हे प्रकरण आजघडीला न्यायप्रविष्ट आहे. असे असतांना आणि कर आकारणी नियमाला धरून नसल्याबाबत महापालिका प्रशासनाला सांगितल्यावरही कारवाई करण्यात आली. ही कारवाई बेकायदेशीर आणि नियमाला धरून नसल्याने महापालिकेविरुद्ध अवमान याचिका दाखल करण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jawahar medical college deans office frozen dhule municipal corporation takes action due to arrears mrj