जळगाव : महाविकास आघाडीतर्फे जळगाव आणि रावेर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांतून बुधवारी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. जळगाव मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पाटील आणि रावेर मतदारसंघातील शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे शहरात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवार श्रीराम पाटील यांचा अर्ज दाखल झाल्यानंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वच चकित झाले.
खडसे भाजपमध्ये जाणार, हे त्यांनी स्वतःच सांगितले आहे. त्यांनी पक्षाकडे राजीनामा दिला आहे. खडसेंचा विषय जुना झाला असून, नवीन काही विचारा. तसेच खडसेंचा राजीनामा आणि लोकसभा निवडणुकीचा संबंध नाही, असे नमूद करीत जयंत पाटील यांनी अधिक बोलणे टाळले. त्यांनी महाविकास आघाडीचे जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघांतील उमेदवार चांगल्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा दावाही केला.
हेही वाचा – नरेंद्र मोदींची हवा संपली, संजय राऊत यांचा दावा
हेही वाचा – धुळे मतदारसंघात एमआयएमकडूनही उमेदवार ?
अजित पवार गटाचे नेते मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याविषयी विचारले असता, कोण अनिल पाटील, असा प्रश्न जयंत पाटील यांनी केला. असे बरेच भुरटे आमच्यातून गेले आहेत; परंतु निष्ठेचे जे आहेत, ते तुतारी वाजविल्याशिवाय राहणार नाहीत. अमळनेरमध्ये तुतारी हीच अनिल पाटील यांचा पराभव करणार, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त करुन आगामी काळात होणार्या विधानसभा निवडणुकीत मंत्री पाटील यांच्यासमोर अमळनेरमधून आव्हान देणार असल्याचे नमूद केले.