नाशिक : पेट्रोलियम उद्योगात वापरल्या जाणाऱ्या सामग्रीच्या निर्मितीसाठी जिंदाल समुहाने अमेरिकेच्या हंटिंग एनर्जीच्या सहकार्याने सिन्नर येथे प्रगत अत्याधुनिक सुविधेच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला. तेल, वायू विहिरी आणि वाहिनीच्या रचनेत वापरले जाणारे पाईप तसेच अन्य सामग्रीला ट्युबलर (ओसीजीटी) उत्पादने म्हणून ओळखले जाते. या प्रकल्पाची वार्षिक थ्रेडिंग क्षमता ७० हजार मेट्रिक टन (ओसीटीजी) आहे.
ओसीटीजी बाजारात पाईप, ट्यूब्स आणि अत्युच्च दर्जाचे उत्पादन आणि पुरवठा करण्यास सक्षम असलेली देशातील ही एकमेव सुविधा आहे. पेट्रोलियम उद्योगात तेल, वायू विहीर आणि वाहिन्यांच्या रचनेत केसिंग, ट्युबिंग व पाईपिंग पाया मानला जातो. तेल व वायू उत्पादनांची सुरक्षित व कार्यक्षम वाहतूक वाहिन्यांमधून होते. आजवर ही सर्व उत्पादने परदेशातून आयात करावी लागत होती. या सुविधेमुळे मोठ्या प्रमाणात निर्यातीची संधी उपलब्ध झाल्याचे जिंदाल सॉचे अध्यक्ष पी. आर. जिंदाल यांनी नमूद केले.
नव्या प्रकल्पात या उद्योगासाठी लागणारी सर्वसमावेशक सामग्री, प्रक्रिया होईल. यात लोह आणि पोलाद, तसेच मिश्र धातू पोलाद आणि विदेशी मूल्यवर्धित श्रेणींचा समावेश आहे. हंटिंग पीएलसीचे मुख्य कार्यकारीअधिकारी जिम जॉन्सन यांनी ही भागीदारी एक मैलाचा दगड ठरल्याचे सांगितले. ऑगस्ट २०१९ मध्ये जिंदाल समुहाशी झालेल्या धोरणात्मक भागीदारीमुळे चार वर्षांत विकसित झालेल्या ध्येयाच्या पूर्ततेसाठी मोठी प्रगती झाली. उभयतांनी पेट्रोलियम उद्योगासाठी लागणाऱ्या सामग्रीच्या उत्पादनाचा शुभारंभ करीत इतिहास रचला. हा प्रकल्प स्थानिक पेट्रोलियम उद्योगांसाठी लाभदायक ठरेल. तसेच भारताच्या ऊर्जा क्षेत्राला चालना देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तेल आणि वायू क्षेत्राच्या कठोर मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रकल्पात उच्च दर्जाच्या उत्पादनांची हमी देण्यासाठी स्वयंचलीत प्रणाली व अत्याधुनिक चाचणीची व्यवस्था आहे. हंटिंग एनर्जी सर्व्हिसेस ही तेल, वायू विहिरींचे बांधकाम, उत्खनन आणि पुरवठा या साखळीत हायड्रोकार्बन काढण्यासाठी आवश्यक घटकांची निर्माती आहे. तर जिंदाल एसएसडब्लू भारत, अमेरिका, युरोप आदी देशात लोखंडी पाईप उत्पादन, जोडणी व सुट्या भागांचा पुरवठा करणारी आघाडीची जागतिक उत्पादक आणि पुरवठादार आहे. उभयतांनी या प्रकल्पात मोठी गुंतवणूक केली आहे.