नाशिक : लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर महायुती सरकारने लाडकी बहीण योजना आणली. महिलांना लाच देऊन त्या पराभवातून सावरण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु, राज्यातील महिला मुर्ख नाहीत. तेल, डाळ, चकलीचे पीठ आदींच्या दरवाढीने त्यांची दिवाळी महाग झाली. फराळ बनविताना त्यांच्या डोळ्यात अश्रू येत असून दुसरीकडे महाराष्ट्राची तिजोरी रिक्त झाल्यामुळे सर्व शासकीय योजना बंद होऊन पोलीस, शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी पैसे राहिले नसल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार) नेते जितेंद्र आव्हाड यांनी केला.
नाशिक पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश गिते यांचा उमेदवारी अर्ज आव्हाड यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आला.यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मध्य प्रदेशमध्ये सुरू केलेली लाडकी बहीण योजना निवडणूक झाल्यानंतर बंद पडल्याचा दावा केला. महाराष्ट्रात कुठलेही नियोजन न करता सुरू केलेल्या या योजनेमुळे विविध समाजघटक, महिला, आरोग्याच्या सर्व योजना बंद पडल्या आहेत.
हेही वाचा…राजकीय फेऱ्यांमुळे कोंडीचा फेरा
u
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्याची आर्थिक स्थिती सुधारून महिलांना तीन हजार रुपये द्यायचे निश्चित झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात कोणीही सुरक्षित नाही. बदलापूर प्रकरणात संशयित अक्षय शिंदेला का मारले हे रहस्य असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात गद्दारीची जी परंपरा सुरू झाली आहे, ती मोडीत काढणे हा महाराष्ट्र धर्म आहे. राज्यातील ५५ कारखाने गुजरातला गेले असून बेरोजगारी वाढत आहे. नाशिकमध्ये कधीकाळी असणारे मोठे उद्योग कुठे गेले, असा प्रश्न करुन जो महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकला नव्हता, तेथील आजचे राज्यकर्ते गुजरातपुढे झुकल्याचे टिकास्त्र त्यांनी सोडले.