लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाशिक : आदिवासी, कष्टकरी आणि शेतमजूर यांच्या प्रश्नांसाठी हजारो आदिवासी बांधवांना घेऊन नाशिक-मुंबई पायी मोर्चा काढणारे आणि नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कित्येक दिवस ठाण मांडून अविरत संघर्ष करणारे माकपचे माजी आमदार जिवा पांडू गावित हे साडेतीन कोटींचे धनी आहेत.

दिंडोरी मतदार संघात गावित यांनी माकपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक-मुंबई पायी मोर्चा काढणाऱ्या गावितांकडे १९ लाखांची इनोव्हा मोटार आहे. व्यवसायाने शेतकरी असणाऱ्या गावितांची मालमत्ता पाच वर्षात जवळपास एक कोटीने वाढली असताना दुसरीकडे सुमारे सात लाखांचे दायित्व कमी झाले. त्यांच्याकडे सध्या दोन कोटी ३६ लाख ४० हजार रुपयांची चल संपत्ती आहे. त्यांच्या स्थावर मालमत्तेचे (अचल) आजचे बाजारमूल्य एक कोटी सात लाखहून अधिक आहे.

आणखी वाचा-निवडणुकीत संशयास्पद आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवा, खर्च निरीक्षकांची सूचना

गावितांकडे एक लाख १० हजार रुपयांचे दागिने असताना पत्नीकडे एक रुपयाचाही दागिना नाही. विविध बँकांमध्ये दोन कोटी सहा लाखाची रक्कम आहे. सुरगाणा तालुक्यातील पाच ते सहा गावांत ४७ एकर शेतजमीन आणि सुरगाणा येथे भूखंड त्यांच्या नावावर आहे. गावितांवर सात वेगवेगळे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. एका प्रकरणात त्यांना तीन हजार रुपयांचा दंड अथवा दंड न भरल्यास १५ दिवसांची साधी कैद अशी शिक्षा झाली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jiva pandu gavit is owner of three and a half crores property mrj