धुळे : जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी महसूल, आरोग्य आणि पोलीस विभाग यांच्या संयुक्त पथकाने धुळे जिल्ह्यातील सोनोग्राफी,एमटीपी आणि प्रसूतीगृहांची अचानक तपासणी केली. या तपासणीत दोन रुग्णालय आणि एका सोनोग्राफी केंद्राला नोटीस बजावण्यात आली, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्ता देगांवकर यांनी दिली.
मुलींचा घटता जन्मदर ही एक सामाजिक समस्या निर्माण झाली आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असून भविष्यात हा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने मुलींचा जन्मदर वाढावा, यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहेत. धुळे जिल्ह्यात गर्भधारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व निदान तंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित २००३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्ह्यातील सर्व सोनोग्राफी, एमटीपी आणि प्रसूतीगृह यांची तपासणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा पीसीपीएनडीटी धुळे जिल्हास्तरीय दक्षता समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी दिले होते. या पार्श्वभूमीवर महसूल विभाग,आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या चार पथके तयार केली होती. या पथकांच्या माध्यमातून एकाच दिवशी धुळे जिल्ह्यातील १६ सोनोग्राफी केंद्र, आठ एमटीपी केंद्र आणि चार रुग्णालयांची तपासणी करण्यात आली.
तपासणी दरम्यान शहरी भागातील चार रुग्णालयांपैकी दोन रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आली. तालुकास्तरीय पथकांमार्फत साक्री येथील नऊ सोनोग्राफी केंद्र तर, चार एमटीपी केंद्रांची तपासणी करण्यात आली. तसेच शिंदखेडा येथील तीन सोनोग्राफी केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यातील एका केंद्राला नोटीस बजावण्यात आली. शिरपूर येथे चार सोनोग्राफी केंद्र आणि चार एमटीपी केंद्रांची धडक मोहिमे अंतर्गत तपासणी करण्यात आली. या कारवाईनंतर पुढील कालावधीत या प्रकारची कारवाई संपूर्ण धुळे जिल्ह्यात तसेच गुजरात आणि मध्य प्रदेश सीमेलगतच्या सोनोग्राफी केंद्रांवर करण्यात येणार आहे.
अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचणी आणि गर्भलिंग निदान करणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४४७५/१०४ किंवा आमची मुलगीमहा डाॅट इन या संकेतस्थळावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. दिलेली माहिती खरी असल्यास खबरी योजनेतंर्गत माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. असे आवाहन धुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देगांवकर यांनी केले आहे.