लोकसत्ता वार्ताहर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मालेगाव : येथील रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना न्यायालयाने गुरुवारी ७ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. त्यामुळे आता त्यांचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हिरे कुटुंबियांशी संबंधित येथील रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेसाठी दहा वर्षापूर्वी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ७ कोटी ४६ लाखाचे कर्ज घेण्यात आले होते. या कर्जप्रकरणात बँकेची फसवणूक झाल्याप्रकरणी येथील रमजानपुरा पोलीस ठाण्यात २७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अन्य सर्व संशयितांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला. मात्र हिरे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यामुळे गेल्या १५ नोव्हेंबर रोजी बँक कर्ज घोटाळ्याप्रकरणी पोलिसांनी हिरे यांना अटक केली. अटकेनंतर न्यायालयाने पहिल्या वेळेस पाच दिवस व दुसऱ्या वेळेस तीन दिवसांची पोलीस कोठडी त्यांना सुनावली होती. ही मुदत संपत असल्याने गुरुवारी हिरे यांना जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश एस.बी.बहाळकर यांच्या न्यायालयात उभे करण्यात आले.

आणखी वाचा-नाशिक : शेतकऱ्याकडील एक लाख रुपयांची लूट, तीन जणांविरुद्ध गुन्हा

यावेळी संशयितास न्यायालयीन कोठडी देण्यास हरकत नसल्याचे म्हणणे पोलिसांच्या वतीने न्यायालयात मांडण्यात आले. त्यामुळे न्यायमुर्तींनी हिरे यांना न्यायालयीन कोठडी दिली आहे. पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी मिळाल्याने हिरे यांच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हिरे यांच्या जामिनासाठी येथील न्यायालयात लवकरच अर्ज दाखल करण्यात येणार असून लवकरच त्यांचा जामीन मंजूर होईल,असा विश्वास हिरे यांची न्यायालयात बाजू मांडण्यासाठी खास येथे आलेले अॅड.आसिम सरोदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना व्यक्त केला. हे प्रकरण फौजदारी स्वरुपाचे नाही आणि हिरे यांना जास्तीत जास्त काळ पोलीस कोठडीत राहावे लागावे या उद्देशाने या प्रकरणात काही कलमे चुकीच्या पध्दतीने लावत पोलीस यंत्रणेचा दुरोपयोग करण्यात आला,असा आक्षेपही सरोदे यांनी घेतला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Judicial custody of advaya hiray way of bail is now clear mrj
Show comments