नवरात्र उत्सवासाठी नाशिक नगरी सज्ज

अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवासाठी नाशिक नगरी सज्ज होत असताना शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री कालिकादेवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सशुल्क दर्शनाची व्यवस्था करण्याचा निर्णय मंदिर विश्वस्तांनी जाहीर केला. या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शविला असताना विश्वस्त मंडळ आपल्या निर्णयावर ठाम आहे.

श्री कालिकादेवी मंदिराची नवरात्र उत्सवासंदर्भात नियोजन बैठक नुकतीच झाली. नवरात्र उत्सवात शहरासह उत्तर महाराष्ट्र, पालघर, वाडा, सूरत आदी ठिकाणांहून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. या दूरवरून येणाऱ्या भाविकांना उत्सव काळात गर्दीमुळे रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते. बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांसाठी यंदा सशुल्क दर्शनाचा पर्याय देवस्थानच्या वतीने समोर ठेवण्यात आला आहे. यासाठी प्रति व्यक्ती १०० रुपये शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे विश्वस्त केशवराव पाटील यांनी दिली.

मागील वर्षी बाहेरगावहून येणाऱ्या भाविकांनी याबाबत विचारणा केल्यानेच हा निर्णय घेण्यात आला. सशुल्क दर्शनाच्या माध्यमातून जमा होणारा पैसा हा मंदिर सुशोभिकरणासह भक्तनिवासच्या कामासाठी वापरण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले. मात्र देवस्थानच्या या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. याआधीही देवस्थानचे मंदिर सुशोभिकरण किंवा अन्य काही कामांसाठी ऑनलाइन दर्शन, भक्तनिवास आदी प्रकल्पांची आखणी केली. मागील वर्षी ऑनलाइन दर्शनाचा प्रयोग सपशेल फसला. संबंधित कंपनीला या मंदिराचे विपणन योग्य पद्धतीने न करता आल्याने तसेच गर्दीत का असेना प्रत्यक्ष दर्शन होत असतांना ऑनलाइन दर्शनसाठी तांत्रिक उठाठेवी कशाला, अशा शंका उपस्थित करत भाविकांनीच या प्रकल्पाकडे पाठ फिरवली, दुसरीकडे भक्त निवासला प्रतिसाद लाभत आहे. उत्सव काळात भक्तनिवास भाविकांसाठी खुले करावे, अशी मागणीही करण्यात येत आहे.

ग्रामदैवत असताना सशुल्क दर्शनाचा अट्टहास का?

श्री कालिकामाता नाशिकचे ग्रामदैवत आहे. शहर परिसरातून पहाटेपासून रात्रीच्या आरतीपर्यंत देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. अशा स्थितीत स्थानिकांच्या भावनांचा विचार न करता दुसऱ्या जिल्ह्य़ातील भाविकांसाठी सशुल्क दर्शनाचा पर्याय समोर ठेवत स्थानिकांना ताटकळत ठेवणे कितपत योग्य आहे?  मुळात मंदिराच्या गाभाऱ्याच्या रचनेचा विचार केल्यास हे ‘व्हीआयपी’ दर्शन गर्दीतून कसे घडेल?   – सुजाता कोपरकर (भाविक)

भक्तनिवासला प्रतिसाद उत्तम

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने श्री कालिका मंदिराच्या आवारात भक्तनिवास बांधण्यात आले आहे. केवळ रुग्ण किंवा रुग्णाच्या नातेवाईकाला डॉक्टरांच्या शिफारसीनुसार भक्तनिवासाची खोली मिळते. यामधून मिळणाऱ्या निधीचा वापर हा भक्तनिवासात नागरिकांना सेवा-सुविधा देण्यासाठी करण्यात येत आहे.

Story img Loader