नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यातील एक स्थान असलेल्या इगतपुरी तालुक्यातील कपिलधारा तीर्थस्थळाला आगामी कुंभमेळ्यासंदर्भात आर्थिक निधी मिळण्याची आवश्यकता कपिलधारा तीर्थस्थळी आयोजित साधु, संत संमेलनात मांडली गेली.
कपिलधारा तीर्थस्थळ हे सिंहस्थाचे मूळ स्थान मानले जाते. सिंहस्थ, कुंभमेळ्यात या ठिकाणी साधु, महंत शाहीस्नान करतात. ध्वजवंदन करत असतात. मागील कुंभमेळ्यात महंत फलहारी महाराज यांच्या पाठपुराव्यामुळे तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री छगन भुजबळ यांनी रस्ते, तीर्थ विकास अंतर्गत विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळवून दिला होता. २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळाव्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मंत्रालयात बैठक होणार असून सिंहस्थाचे मूळ स्थान असलेल्या कपिलधारा तीर्थाला आर्थिक निधी देण्याची मागणी करणार असल्याचे आखाडा परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ता भक्तीदास महाराज यांनी सांगितले.
नाशिक जिल्ह्यात होणाऱ्या कुंभमेळाव्याचा उल्लेख हा नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि कपिलधारा तीर्थ कावनई असा करावा, अशी सूचनाही संत संमेलनात करण्यात आली. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे आगामी कुंभमेळ्यासंदर्भात प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्या आतापर्यंत अनेक बैठका झाल्या असल्या तरी कावनई कपिलधारा तीर्थावर अद्याप एकही बैठक झाली नसल्याने हे तीर्थस्थळ वंचित ठेवले जात असल्याची नाराजी कपिलधारा तीर्थाचे विश्वस्त कुलदीप चौधरी यांनी व्यक्त केली. कुंभमेळा मंत्र्यांनी कपिलधारा तीर्थ कावनई येथे भेट देऊन सिहंस्थ कृती आराखड्यात या स्थानाला समाविष्ट करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
संमेलनास डॉ. भक्तीचरण दास, चंद्रदेवदास, रामस्नेहीदास, लालदास, पूरनचंद्र दास, पितांबर दास, झारखंड दास, चंद्रमा दास, नामदेव महाराज, प्रभुदास या महंतांसह विश्वस्त कुलदीप चौधरी, तुलसीराम बबेरवाल, ज्ञानेश्वर भागवत, दीपक मंगे, प्रवीण भागवत, मुरलीधर पाटील, बबन हंबीर, रामभाऊ पाटील आदी उपस्थित होते.