NCP Rohit Pawar vs BJP Ram Shinde in Assembly Election 2024: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यातील दक्षिण अहमदनगर लोकसभेत भाजपाला शरद पवारांच्या गटाचे उमेदवार निलेश लंके यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. दक्षिण अहमदनगर लोकसभेत मोडणाऱ्या कर्जत-जामखेड विधानसभेचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीचा पराभव करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. आता विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि काका अजित पवार यांच्याकडून रोहित पवार यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभेत सुनेत्रा पवार यांचा पराभव होताच, अजित पवार यांचे धाकटे सुपुत्र जय पवार यांची कर्जत-जामखेडमध्ये उठ-बस पाहायला मिळाली. ऑगस्ट महिन्यात जय पवार यांनी मतदारसंघाचा दौरा करत, “मी इथे पुन्हा येईन..”, असे जाहीर केले. त्यामुळे रोहित पवारांना भाजपा आणि पवार घराणे अशी दुहेरी लढाई लढायची आहे.
दुष्काळग्रस्त आणि बेरोजगारीच्या प्रश्नाने वेढलेला मतदारसंघ
कर्जत-जामखेडमधील बहुसंख्या शेतकरी कोरडवाहू शेती करतात. मतदारसंघात उद्योगधंदे नाहीत. एमआयडीसी आणण्यावरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. मविआचे सरकार गेल्यानंतर प्रत्येक अधिवेशनात रोहित पवार या मुद्द्यावरून आंदोलन करताना दिसतात. या मतदारसंघात जातीची समीकरणेही महत्त्वाची आहेत. इतर मागासवर्गीय समाजाची संख्या मोठी आहे. मराठा कार्ड आणि माधव (माळी, धनगर, वंजारी) ही राजकीय बांधणी निकालावर प्रभाव टाकते. राम शिंदे हे धनगर समाजाचे असल्याने धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा इथे महत्त्वाचा ठरतो.
हे वाचा >> Shirdi Assembly Constituency: शिर्डी विधानसभा: विखेंचा गड यंदा ढासळणार की शाबूत राहणार?
आमदार रोहित पवारांसाठी निवडणूक सोपी नाही
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात धारधार टीका केली. अजित पवार गटातील नेतेही रोहित पवार यांना लक्ष्य करताना अनेकदा दिसले आहेत. २०१९ साली मीच रोहितला कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला होता, तसेच त्याला मदत केली होती, असा दावा अजित पवार यांनी मध्यंतरी भाषणात केला होता. तर रोहित पवार यांनी पलटवार करताना बारामती लोकसभेप्रमाणेच कर्जत-जामखेडमधूनही पवार कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तविली.
बारामतीप्रमाणेच कर्जत-जामखेडमध्येही पवार विरुद्ध पवार संघर्ष उद्भवलेला असताना भाजपाचे आमदार, माजी मंत्री राम शिंदे हेदेखील पुन्हा एकदा कर्जत-जामखेडमधून विधानसभेवर जाण्यास इच्छुक असल्याचे दिसते. विधानपरिषदेची आमदारकी मिळाली असली तरी राम शिंदे हे कर्जत-जामखेड लढविण्यासाठी इच्छुक आहेत. २००९ आणि २०१४ साली त्यांनी येथून विजय मिळविला होता. तसेच २०१४ साली सत्ता आल्यानंतर त्यांना मंत्रीपदही मिळाले होते. मात्र २०१९ साली पराभव झाल्यामुळे त्यांची विजयाची हॅटट्रीक चुकली. बाहेरच्या आणि तेही नवख्या उमेदवाराकडून पराभव स्वीकारावा लागल्याची बोच शिंदे यांच्या मनात कायम आहे.
राम शिंदे पुनरागमन करणार?
राम शिंदे यांनी हलाखीच्या परिस्थितीतून पुढे येत जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचा मान मिळविला होता. सालकरी गड्याचा मुलगा ते मंत्री अशी भरारी त्यांनी घेतली होती. मात्र या भरारीने त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाहीत, अशीही भावना पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात निर्माण झाली होती. पराभवाने त्याची त्यांना जाणीव करून दिली. एमएस्सी. बीएड. केल्यानंतर त्यांनी सुरुवातीचे काही काळ आष्टी (बीड) येथील एका महाविद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. युती सरकारच्या काळात अण्णा डांगे मंत्री असताना त्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव चौंडी (जामखेड) येथे चौंडी विकास प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पावर दैनंदिन लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी अहिल्यादेवींच्या माहेरकडील वंशज म्हणून राम शिंदे यांना प्रकल्पावर सदस्य म्हणून संधी दिली. तेथूनच राम शिंदे भाजपमध्ये सक्रिय झाले. पुढे अण्णा डांगे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली व ते राष्ट्रवादीत गेले, मात्र राम शिंदे भाजपमध्येच राहिले.
यंदा राम शिंदे यांना पुन्हा उमेदवारी मिळणार की भाजपा येथे दुसराच उमेदवार पुढे करणार किंवा हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे जाणार? याबाबत अद्याप तरी चित्र स्पष्ट नाही.
कर्जत जामखेड मतदारसंघाचा राजकीय इतिहास
कर्जत जामखेड मतदारसंघाची रचना झाल्यानंतर १९६२ ते १९७८ पर्यंत काँग्रेसच्या एकनाथ निंबाळकर यांनी हा मतदारसंघ स्वतःकडे राखला. १९७८ साली आरपीआयचे बाजीराव कांबळे याठिकाणी निवडून आले. त्यानंतर १९८० ते १९९५ पर्यंत पुन्हा १५ वर्ष काँग्रेसच्या आमदारांचा याठिकाणी विजय झाला. १९९५ साली भाजपाचे सदाशिव लोखंडे याठिकाणी निवडून आले. ते २००४ पर्यंत सलग तीनवेळा येथून निवडून आले होते. २००९ साली सदाशिव लोखंडे शिवसेनेकडून शिर्डी लोकसभेतून निवडून आले. तर त्यांच्या जागी राम शिंदेंनी याठिकाणी विजय मिळविला. एकनाथ निंबाळकर आणि सदाशिव लोखंडे यांच्याप्रमाणेच हॅटट्रीक साधण्याची शिंदे यांची संधी हुकली.
२०१४ आणि २०१९ ची आकडेवारी काय सांगते?
राम शिंदे यांनी २०१४ साली कर्जत-जामखेडमधून विजय मिळविला असला तरी त्यांच्या मतांची संख्या ८४,०५८ इतकी होती. तर दुसऱ्या क्रमाकांवर असलेल्या रमेश खाडे (संयुक्त शिवसेना) यांना ४६,२४२ तर तिसऱ्या स्थानावरील जयसिंग फाळके (संयुक्त राष्ट्रवादी) यांना ४६,१६४ एवढी मते मिळाली होती. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे महाविकास आघाडीमध्ये एकत्र आहेत. त्यामुळे त्यांच्या मतांची बेरीज केल्यास ती अधिक होते. (२०१४ साली सर्व पक्षांनी स्वबळावर निवडून लढविली होती.)
२०१९ सालच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोहित पवार यांनी १ लाख ३५ हजार ८२४ मते मिळविली होती. तर तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांना ९२,४७७ मते मिळाली होती. केंद्रात आणि राज्यात सत्ता असूनही राम शिंदे यांना मतदारसंघ कायम राखता आला नाही.
कर्जत जामखेड विधानसभेतून २०२४ साठीचे उमेदवार कोण?
कर्जत जामखेडमधून एकूण ३७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून त्यापैकी चार जणांचे अर्ज बाद झाले आहेत. रोहित पवार विरुद्ध भाजपाचे राम शिंदे असा हा सामना होणार आहे. वंचित बहुजन आघाडीकडून सोमनाथ भैलुमेही रिंगणात आहेत. तसेच याच मतदारसंघात दोन राम शिंदे आणि दोन रोहित पवार असे नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवारही निवडणुकीत उतरले आहेत.
ताजी अपडेट
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. रोहित पवार आणि राम शिंदे यांनी एकमेकांवर जोरदार टीका-टिप्पणी सुरू केली असून काही संभामध्ये टिकेचा स्तर घसरलेला दिसला. रोहित पवार यांनी १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या या सभेतील काही निवडक क्षणांचा एकत्रित व्हिडीओ आपल्या एक्स हँडलवर शेअर केला आहे.
भाजपाचे नेते पाशा पटेल यांनी भाजपाचे उमेदवार प्रा. राम शिंदेंच्या प्रचारार्थ सभेत असभ्य व अश्लील भाषा आणि केलेल्या हातवारेच्या विरोधात कर्जत आणि जामखेड मधील महिला आक्रमक होत या वक्तव्याचा निषेध करीत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यासह जामखेड पोलीस चौकीसमोर कर्जत शहराच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाशा पटेल यांचा पुतळयास जोडे मारत जाळण्यात आला.
l