नाशिक – उन्हाळ्याचा कडाका वाढू लागल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाण्याची टंचाई जाणवण्यास सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू असला तरी पाण्याचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. अनेक गावांना टँकरची प्रतिक्षा आहे. पेठ तालुक्यातील खिरोणापाडा यापैकी एक. या पाड्याने टंचाईवर स्वत: पैसे खर्च करुन तात्पुरता पर्याय शोधला आहे.

पेठ तालुक्यातील खिरोणापाडाची ग्रामपंचायत डोल्हाळमाळ असून लोकसंख्या सुमारे २२५ आहे. गावात विहीर आहे. उन्हाळ्याला सुरुवात होताच विहीर आटते. यंदा विहीर लवकर आटल्याने फेब्रुवारी अखेरपासूनच महिलांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू झाली. गावाला भेडसावणारा पाणीप्रश्न दूर करण्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येत एक पर्याय शोधला. गावापासून जवळ असलेल्या उंबुरणा येथील विहिरीतून गावात पाणी पोहचविण्यासाठी प्रत्येक कुटुंबाकडून १०० रुपये वर्गणी जमा करण्यात आली. डिझेलवरील यंत्राद्वारे पाझर तलावातील पाणी उपसा करुन टँकरमध्ये भरायचे. आणि तो टँकर गावातील विहिरीत रिता करायचा असा पर्याय शोधला गेला.

गावातील विहिरीत जमा होणारे पाणी ग्रामस्थांना कधी महिनाभर तर कधी दोन आठवडे पुरते. पाण्यासाठीची पायपीट एक दिवसाची नसून प्रत्येक उन्हाळ्यात ग्रामस्थांना या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. महिलांना दररोजच्या त्रासापासून सुटका मिळावी, पाणी टंचाई दूर व्हावी, यासाठी ग्रामपंचायतीकडे सतत पाठपुरावा करूनही पाणी पुरवठा विभागाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे. उन्हाचा पारा जसा वर चढत जातो, त्याप्रमाणे गावातील महिलांच्या डोक्यावरील हंडा आणि पाणी उपसा करण्यासाठी फेऱ्या वाढत जातात.

डोल्हारमाळ ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या खिरोणापाडासारखे अनेक पाडे पाण्यापासून वंचित आहेत. छोट्या पाड्यांची ही अवस्था पाहता ही समस्या सोडविण्यासाठी कुणीही पुढे येताना दिसत नाही. आदिवासी भागात असे अनेक लहान पाडे टंचाईग्रस्त असून याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. महसूली गाव नसल्याने निधीअभावी काम केले जात नाही, अशीही तक्रार आहे.

दुसरीकडे, जलजीवन मिशन योजना खिरोणापाड्यात नाही. गावात जलवाहिनीव्दारे तलावाचे पाणी विहिरीत टाकावे लागत आहे. शासन स्तरावर दमणगंगाच्या माध्यमातून पाण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असतांना स्थानिक गाव, पाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या पाचवीला पूजली आहे. डोल्हारमाळ परिसरातील सर्व गावांची पाणी देतांना गावांचे सर्व्हेक्षण करण्यात यावे, अशी मागणी आहे. त्यानुसार पिण्यासाठी तसेच वापरासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे, जलजीवन योजना काही गावांना सुरुवात झाली असली तरी गावाची तहान भागवण्यात योजना कुचकामी ठरली आहे.

अशा गावांना दरवर्षी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी वारेमाप खर्च करण्यात येतो. परंतु, गावांची या समस्येपासून कायमची सुटका करण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही.

ग्रामस्थ खंडु दिवे यांनी टंचाई परिस्थितीविषयी माहिती दिली. गावकरी स्वखर्च करुन पाणी मिळवतात. पण त्यासाठी महिन्याकाठी तीन हजार रुपये लागतात. हे पाणी महिनाभर पुरते. पण सध्या गावात बांधकाम सुरू असल्याने पाणी जास्त लागत आहे. शिवाय कोणाकडे काही कार्य निघाले तर पाणी पुरत नाही. मी पाचवीला होतो तेव्हापासून हा प्रश्न कायम आहे. गावातील पाणी प्रश्न पाहता लग्नासाठी मुलगी लवकर मिळत नाही. कामधंद्याचा प्रश्न आहे. शासनाने हा प्रश्न लवकर सोडवावा, अशी त्यांनी मागणी केली.

खिरोणापाडा गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी दरवर्षी प्रत्येक घरामागे १०० रुपये वर्गणी गोळा करत यंत्राद्वारे पाझर तलावातील दूषित पाणी गावातील विहिरीत टाकले जाते. हे पाणी पिण्यामुळे गावाला आजाराला सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे, शुध्द पाणी मिळवण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागते.