नाशिक – सिन्नर शहरातील प्रकाश नगरात राहणाऱ्या युवकाला घरातून शस्त्राचा धाक दाखवत पळवून नेण्यात आले होते. त्याच्या सुटकेसाठी २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. यासंदर्भात सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी अवघ्या सहा तासांत संशयितांच्या ताब्यातून युवकाची सुटका केली.
सिन्नर येथील प्रकाश नगरात अर्जुन गुप्ता हा मित्र किरण चक्रधर सोबत अभ्यास करण्यासाठी खोली भाड्याने घेऊन राहतो. सोमवारी रात्री खोलीत सहा संशयित शिरले. त्यांनी बंदुक आणि चाकूचा धाक दाखवत किरण आणि अर्जुन यांचे हातपाय बांधून तोंडास चिकट टेप गुंडाळून किरण यास न्हाणीघरात कोंडून अर्जुनचे अपहरण केले. त्याच्या भ्रमणध्वनीवरून अर्जुनच्या मोठ्या भावाशी संपर्क साधत २० लाख रुपये न दिल्यास भावाला मारून टाकू, अशी धमकी संशयितांनी दिली. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हेही वाचा – पिंपरी : मोठ्याने शिव्या दिल्याचा विचारला जाब; पेट्रोल टाकून महिलेची जाळली दुचाकी…
सिन्नर पोलिसांनी अर्जुनच्या घरी जाऊन माहिती घेतली. तपास पथक तयार केले. अर्जुनसोबत असणारे निखिलेश रावत आणि अनिस मोहम्मद दोघे सायंकाळपासून घरी नसल्याचे दिसल्याने निखिलेशचा शोध घेतला. त्याच्याकडे चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच निखिलेश, गौरव चौधरी, जाफर मोमीन, साहिल तायडे, अनिस मोहम्मद आणि परराज्यातील एक साथीदार यांनी अर्जुनचे अपहरण करुन शंकर नगरातील जाफर मोमी यांच्या भंगार गोदामात डांबले असल्याची माहिती दिली. तपास पथक संबंधित ठिकाणी गेले असता अर्जुन यास चिकटपट्टीने बंदिस्त केल्याचे दिसून आले. त्याची पोलिसांनी सुटका करुन श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तातडीने सिन्नर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.