लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : किन्नर आखाडा नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यात पहिल्यांदाच सहभागी होणार असून त्र्यंबकेश्वरमध्ये जुन्या आखाड्याबरोबर स्नान करणार आहे. या अनुषंगाने त्र्यंबकेश्वरमध्ये जागा मिळावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर स्वामी लक्ष्मीनारायण त्रिपाठी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक -त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यात स्नान करण्यासंदर्भात महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांनी आम्हाला कुठलाही त्रास होणार नाही, असे आश्वासन दिले आहे. सर्वांना समान सुविधा देणार आहोत, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयांचे किन्नर आखाड्याने स्वागत केले आहे. आम्ही सरकारबरोबर आहोत. आतापासूनच आम्ही तयारीला सुरुवात केली आहे. आश्रम बांधण्यासाठी जागा मिळावी, कुंभमेळ्यासाठी जागा द्यावी, सुरक्षा द्यावी, या मागण्या करण्यात आल्या आहेत.
कुंभमेळ्यात आमच्या आखाड्याचे सर्वच उपस्थित राहणार असून विदेशातीलही किन्नर येणार आहेत. ममता कुलकर्णी आमच्या महामंडलेश्वर आहेत आणि राहणार. त्या आमच्याबरोबरच आहेत. त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळ्यात त्या आमच्या बरोबर राहतील, असेही त्रिपाठी यांनी नमूद केले.