नाशिक – संविधानाला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, मोदी सरकार संविधानावर पुस्तक प्रसिद्ध करणार आहे. संविधान कसे तयार झाले, आरक्षणाला विरोध करणा्रे कोण होते, संविधान सभेत पंडित नेहरुंनी आरक्षणाला कसा विरोध केला होता, हे सर्व जनतेसमोर मांडले जाईल. काँग्रेसने संविधानाविषयी खोटे कथानक रचून लोकसभा निवडणुकीत मते मिळवली. परंतु, आता त्यांची पोलखोल होऊन हा विषय काढून ते पस्तावतील, असा दावा संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, नाशिक दौऱ्यावर आलेल्या रिजिजू यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. देशात १९४९ मध्ये संविधान स्वीकारले गेले. परंतु, काँग्रेसला ते लक्षात राहिले नाही. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा होऊ लागल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. निवडणुकीत काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकर यांना विजयी होऊ दिले नव्हते. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांनी घटनेची प्रस्तावना बदलली. आता मात्र काँग्रेसला घटनेचा खोटा कळवळा आला असून संविधानाच्या बनावट प्रति दाखवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे रिजिजू यांनी सांगितले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण हिंदुत्वाला पोषक असे होते. आता मात्र त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांनी अल्पसंख्याकांच्या लांगुलचालनाचे धोरण स्वीकारले. देशासाठी अपार कष्ट सोसणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान राहुल गांधी सातत्याने करतात. त्यांच्याच सहकार्याने उद्धव ठाकरे यांची शिवसेना निवडणूक लढवित असून हे खेदजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा >>>सत्यशोधक कम्युनिस्ट नेते सुभाष काकुस्ते यांचे निधन
एअरबसचा प्रकल्प गुजरातला पळवून नेण्यात आल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केल्यासंदर्भात रिजिजू यांनी ते काहीही बोलत असतात, संसदेत आम्ही त्यांना गांभिर्याने घेत नसल्याचे सांगितले. आज सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात होत असल्याचा दावाही त्यांनी केला. प्रादेशिक विचार करणे योग्य नाही. कोणत्याही भागात विकास झाला तरी भारतीय म्हणून अभिमान वाटायला हवा. मोदींसारखे पंतप्रधान जगात कोणत्याही देशाला मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला.