नाशिक – विविध कारणांनी गाजलेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी सकाळपर्यंत चाललेल्या मतमोजणीत अखेर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांनी विजय मि‌ळवला. विजयासाठी ३१ हजार ५७६ मतांचा निश्चित कोटा असून दराडे यांनी तो पूर्ण केल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. दराडे यांनी प्रतिस्पर्धी भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांना पराभूत केले. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. संदीप गुळवे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. पहिल्या पसंतीच्या मोजणीत उमेदवार कोटा गाठू न शकल्याने रात्री उशिरा दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू झाली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबड येथील वखार महामंडळाच्या गोदामात सोमवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली होती. नाशिक शिक्षक मतदारसंघात एकूण ६४ हजार ८५३ मतदान झाले. यातील ६३ हजार १५१ मते वैध तर, १७०२ मते अवैध ठरली. विजयासाठी ३१ हजार ५७६ मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. रिंगणात २१ उमेदवार होते. पहिल्या पसंतीक्रमाच्या मोजणीत शिंदे गटाच्या किशोर दराडे यांना २६२४७ मते मिळाली. भाजपशी संबंधित अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे १७३७२ मते मिळवून द्वितीयस्थानी राहिले. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार ॲड. गुळवे यांना १६२८० मते मिळाली. या फेरीत उमेदवाराला कोटा गाठता न आल्याने दुसऱ्या पसंतीक्रमाची मोजणी सुरू करण्यात आली. सकाळपर्यंत ही मतमोजणी सुरू होती. किशोर दराडे यांनी मतांचा कोटा पूर्ण केल्यामुळे ते विजयी झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

हेही वाचा – नाशिक: नवीन कायद्यांविरोधात आंदोलन

हेही वाचा – नवीन कायद्यांनुसार पहिल्याच दिवशी पंचवटी पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद

मतमोजणीला विलंब

मतमोजणीत तीन केंद्रांवर पाच मतपत्रिका अधिक आढळल्याने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. चौकशीअंती संबंधित मतपत्रिकांवर अनुक्रमांकाची छपाई झाली नसल्याचे उघड झाले. मतपत्रिकेमागे अधिकाऱ्यांची स्वाक्षरी आणि शिक्का होता. त्यामुळे या मतपत्रिकाही वैध ठरून शिवसेना ठाकरे गटाचा आक्षेप निकाली निघाला. यामुळे मतमोजणीला विलंब झाला.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kishore darade wins in nashik teacher constituency ssb