डोळस आणि धडधाकट व्यक्तीलाही महाराष्ट्रातील सर्वोच्च उंची असलेले कळसुबाई शिखर सर करतांना घाम फुटतो. असे असतांना अंध दुर्गसंवर्धक सागर बोडके यांनी या वर्षांत ११ वेळेस शिखर सर केले आहे. त्यांना रमेश बडदाळे, गणेश बडदाळे, अंकुर यादव आणि जनार्धन पानमंद (अपंग) यांची साथ लाभली आहे.

नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्य़ांच्या सिमेवर असलेल्या कळसूबाई शिखराची उंची समुद्रसपाटीपासून १६४६ मीटर आहे. ज्या ठिकाणी कठीण कातळटप्पा असेल त्या ठिकाणी शिडय़ा बसविलेल्या आहेत. त्यामुळे तीन ते चार तासात कळसूबाई शिखर सर करणे शक्य होते. गरुडझेप प्रतिष्ठानचे अंध दुर्गसंवर्धक सागर बोडके यांनी यंदाच्या वर्षांत १५ जूनपर्यंत २१ वेळा कळसुबाई शिखर सर करण्याचा संकल्प केला असून रविवारी त्यांनी ११ वी मोहीम पूर्ण केली. बोडकेसह त्याच्याबरोबर असलेल्या सर्वानी वाहतूक सुरक्षेचे फलक तसेच गोदा वाचवा-प्रदूषण टाळा, बेटी बचाव-बेटी पढाव अशी सूचना देणारे फलक गळ्यात अडकविले होते. गरुडझेप प्रतिष्ठानचे डॉ. संदीप भानोसे यांच्या हस्ते सागरचा सत्कार करण्यात आला.

Story img Loader