पतंगबाजीत तरुणांसह मुलांची दमछाक; जिल्ह्य़ात पंतगोत्सव उत्साहात
मकरसंक्रातीच्या दिवशी पतंगप्रेमींमध्ये अभूतपूर्व उत्साह संचारला असला तरी त्यांच्या या उत्साहावर वाऱ्याने काहीसे विरजण टाकण्याचे काम केले. अधूनमधून वारा अंतर्धान पावत असल्याने पतंग गिरक्या घेत पुन्हा खालीच झेपावत होते. पतंगाला पुन्हा आकाशात पाठविताना पतंगप्रेमींची दमछाक झाली. सायंकाळी काही प्रमाणात वाऱ्याचा वेग वाढला असला तरी मोठे पतंग आकाशात जाऊ शकले नाही. परिणामी, पतंगांचा माहोल आणि ‘गै बोलो रे धिना..’चा आवाज काहीशा क्षीण झाला. जिल्ह्य़ात प्रसिद्ध असलेला येवला पतंगोत्सव नेहमीप्रमाणे उत्साहात पार पडला.
मकरसंक्रांत म्हणजे पतंगोत्सव. हा उत्सव बच्चे-कंपनीसोबत आबालवृद्ध आणि सर्वच कुटुंबीय उत्साहाने साजरा करतात. त्याचे प्रत्यंतर आदल्या दिवशी पतंग व मांजा खरेदीला उसळलेल्या गर्दीवरून आले होते. शहरातील बाजारपेठेत मिकी माऊस, गरुड, विमान, धोबी, वटवाघुळ आदी विविध प्रकारच्या पतंगांची मोठय़ा प्रमाणात खरेदी झाल्यामुळे मकरसंक्रांतीला पतंगप्रेमींची एकच धूम राहणार असल्याचे स्पष्ट झाले होते. सायंकाळपर्यंत फारसा वारा नसल्याने पतंगोत्सवाचा आनंद लुटता आला नाही. सकाळपासून बच्चे-कंपनी कुठे इमारतीवर, तर कुठे खुल्या मैदानात पोहोचली होती.
आपला पतंग उडविण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला, परंतु वारा नसल्याने त्यांची दमवणूक झाली. बच्चे-कंपनीप्रमाणे युवक व घरातील बडय़ा मंडळींची अवस्था झाली. दुपारनंतर स्थिती काहीशी सुधारली, परंतु सहकुटुंब गच्चीवर गेलेल्यांना मोठे पतंग आकाशात पाठविता आले नाहीत. आकाराने लहान पतंगांवर त्यांना हा उत्सव साजरा करावा लागला.वाऱ्याचा जोर फारसा नसल्याने चिनी बनावटीच्या मोठय़ा कापडी पतंगांचा विचार कित्येकांना सोडून द्यावा लागला. मकरसंक्रांतीसाठी अनेकांनी शेकडो रुपये खर्च करून पांडा, बरेली, फरिदबेग, सहा तारी, नऊ तारी आदी वेगवेगळ्या प्रकारच्या मांज्याची खरेदी केली होती. इतकेच नव्हे तर मध्यवस्तीतील वाडे आणि शहरातील काही इमारतींवर खास ढोल अथवा ‘डीजे’ची व्यवस्था करण्यात आली. काही कुटुंबीयांनी संपूर्ण दिवस गच्चीवर थांबण्यासाठी भोजन व्यवस्थाही त्या ठिकाणी करण्यासाठी धावपळ केली.
या सर्व उत्साहावर काहीसे विरजण पडले. एरवी, या दिवशी आकाश विविधरंगी पतंगांनी भरले जाते. परस्परांचे पतंग काटण्याची स्पर्धा लागते. एकदा का प्रतिस्पध्र्याची पतंग कापली तर लगेच त्या त्या गच्चीवरून ‘गई बोलो रे धिना..’च्या आरोळ्या ठोकल्या जातात. यंदा समाधानकारक वारा नसल्याने हा खेळ काही रंगला नाही.
सायंकाळी ‘तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ अशी विनंती करत घरोघरी बच्चे-कंपनी भ्रमंती करत होती. नागरिकांनी आपल्या आप्तमित्रांना तीळगूळ वाटप करून शुभेच्छा दिल्या. तीळगूळ वाटप करण्याची संस्कृती अद्याप कायम असली तरी या शुभेच्छा देण्याकरिता लघुसंदेश आणि व्हॉट्सअपचा लक्षणीय वापर झाला.