सातबारा उतार्‍यावर शेतीची नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकार्‍यांच्या नावाने १२ हजारांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या कोतवालासह खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी दुपारी अटक केली. भुसावळ येथे हा प्रकार घडलातक्रारदारांनी २०२२ मध्ये कुर्‍हे पानाचे (ता. भुसावळ) येथे स्वतःच्या नावे दोन एकर शेतजमीन विकत घेतली. या शेतजमिनीच्या सातबारा उतार्‍यावर नाव लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालयात प्रकरण सादर केले होते. त्यात भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी त्रुटी काढून तक्रारदारांना भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र धांडे (५४, रा. भुसावळ) यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे तक्रारदारांनी कोतवाल धांडे यांची भेट घेतली.

त्यांनी सातबारा उताऱ्यावर नाव लावण्यासाठी मंडळ अधिकार्‍यांच्या नावाने १५ हजार रुपयांची लाच मागितली. त्याबाबत तक्रारदारांनी मंगळवारी जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्याकडे तक्रार दिली. त्याअनुषंगाने तक्रारीच्या पडताळणीसाठी उपअधीक्षक पाटील यांनी पथक नियुक्त केले. तक्रारदाराकडून कोतवाल धांडे यांच्या वतीने लाचेची तडजोडीअंती ठरलेली १२ हजारांची रक्कम स्वीकारताना हरीश ससाणे (४४, रा. आंबेडकरनगर, भुसावळ) या खासगी व्यक्तीस रंगेहात पकडले. तसेच धांडेलाही अटक करण्यात आली. याप्रकरणी भुसावळ येथील शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader