नाशिक – पुणे येथे हल्लेखोरांकडून कोयत्यांचा वापर केला जात असल्याचे लोण आता नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातही पसरल्यासारखे दिसत आहे. इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारातील हॉटेल दिपाली येथे हातात चाॅपर, कोयते, तलवारी आणि लाठ्याकाठ्या घेऊन हल्ला करणारे टोळके ३० तासांपेक्षा अधिक तास होऊनही मोकाटच आहेत. त्यामुळे घोटी पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
मंगळवारी रात्रीच्या सुमारास संशयित ऋषिकेश पदमेरे (रा. उभाडे, इगतपुरी), ओमकार भोसले, सार्थक धोंगडे, अर्जुन उदावंत, दीपक बनसोडे, सचिन घाणे आणि त्यांचे तीन ते चार साथीदार हे इगतपुरी तालुक्यातील पिंपळगाव मोर शिवारातील हॉटेल दिपाली येथे आले. आमचे भ्रमणध्वनी हरवले असून तुमचे सीसीटीव्ही चित्रण दाखवा, अशी मागणी केली. त्यांना सीसीटीव्ही चित्रण दाखवल्यावर ते बाहेर दारू पीत बसले. यावेळी हाॅटेल मालक तुषार भोसलेचे वडील धनंजय भोसले यांनी पदमेरेला परत आमच्या हॉटेलवर येऊ नको, असे बजावले.
या बोलण्याचा राग आल्याने पदमेरेने त्याच्या मित्रांना बोलावून चॉपर, कोयते, धारदार हत्यारे, दांडके यांसह तुषार भोसले आणि ऋषिकेश भोसले यांना मारहाण केली. सर्वांना गंभीर दुखापत करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हॉटेल समोरील वाहनांचीही तोडफोड केली. घोटी पोलिसांना या हल्ल्याची माहिती मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. परंतु, तोपर्यंत सर्व संशयित फरार झाले होते. घोटी पोलिसांनी तुषार भोसले यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे पिंपळगाव मोर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेतील गंभीर जखमींवर घोटीतील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आल्यानंतर नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार असे गुन्हे घडत आहेत. इगतपुरी तालुक्यात लुटमार, हल्ला करणारी टोळी कार्यरत झाली असून थेट व्यावसायिकांवर हल्ले होत आहेत. त्यामुळे हॉटेल चालक भयभीत झाले आहेत. धामणी येथील ग्रामस्थांनी थेट नाशिक येथे पोलीस अधीक्षक कार्यालयात अपर पोलीस अधीक्षकांची भेट घेत इगतपुरी तालुक्यात आणि घोटी- सिन्नर महामार्गावर होणारी लुटमार, गुंडगिरी थांबविण्याची मागणी केली आहे. हाॅटेलवरील हल्लेखोर ३० तासांपेक्षा अधिक तास होऊनही पोलिसांना सापडत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.