नाशिक : कुंभमेळा नियोजनात गोदावरी नदी आणि त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थातील पाण्याच्या स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारणीची कामे पुढील महिन्यात सुरू केली जातील. नाशिकमधील २४ नाल्यांमधील सांडपाणी अडवून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी १२०० कोटींची योजना तयार करण्यात आली आहे. नाशिकप्रमाणे त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी ११३८ कोटींचा आराखडा तयार करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

नाशिक दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी सकाळी त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजन केले. कुशावर्त तीर्थासह परिसराची पाहणी केली. साधू-महंतांंशी संवाद साधला. नंतर येथील शासकीय विश्रामगृहात सिंहस्थाचे नियोजन आणि तयारीचा आढावा घेतला. प्रयागराज कुंभमेळ्यात गृहीत धरलेल्या अंदाजापेक्षा तिप्पट भाविक सहभागी झाल्याने नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या योजनांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. प्रशासकीय पातळीवर निधीच्या अंतिम आकड्यांवर नव्याने काम होत आहे. नाशिकमध्ये ११ नवीन पूल, रस्त्यांचे व्यापक जाळे तयार केले जाईल. साधुग्रामच्या जागेचे अधिग्रहण, नवीन घाटांची उभारणी आणि सोयी-सुविधा निर्माण केल्या जातील. सिंहस्थ कामांसाठी मोठा निधी लागणार आहे. शासन त्याची कमतरता पडू देणार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सांडपाणी प्रक्रिया केंद्राच्या उभारणीस जादा कालावधी लागणार असल्याने पहिल्यांदा ते काम हाती घेण्यात आले असल्याचे त्यांनी नमूद केले.

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कुंभमेळा प्राधिकरण

उत्तर प्रदेशच्या धर्तीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्यासाठी कायदा आणि मेळा प्राधिकरणाची स्थापना करून कायदेशीर चौकट दिली जाईल. मेळा प्राधिकरण हे पूर्णत: प्रशासकीय राहील. ते अध्यात्माचे प्राधिकरण नाही. कुंभमेळ्याचे व्यावसायिकतेनुसार व्यवस्थापन न झाल्यास आणि दुप्पट, तिप्पट गर्दी झाली तर अडचणी उद्भवू शकतात. अध्यात्माची बाजू साधू-महंत सांभाळतील. व्यवस्थापन, व्यवस्थेची बाजू मेळा प्राधिकरण सांभाळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

त्र्यंबकेश्वरसाठी ११३८ कोटींचा आराखडा

१२ जोर्तिलिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रा्च्या विकासासाठी तयार झालेल्या ११३८ कोटींच्या आराखड्यास लवकरच मान्यता दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. दोन टप्प्यात या ठिकाणी कामे करण्याचे नियोजित आहे. पहिला टप्पा सिंहस्थापर्यंत पूर्ण केला जाईल. आणि उर्वरित काही कामे नंतर होतील. आराखड्यात दर्शनपथ, कुशावर्तसह विविध कुंड आणि प्रमुख मंदिरांचा जीर्णोद्धार, वाहनतळ, घाटांचे नुतनीकरण, वाढीव पाणी पुरवठा योजना आदींचा समावेश आहे. कुशावर्त तीर्थातील पाणी स्वच्छतेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.