कुंभमेळ्यानिमित्त बुधवारी शाही मिरवणूक मार्ग आणि मखमलाबाद नाका येथून निघालेल्या दोन वेगवेगळ्या शोभायात्रांनी शहराच्या अंतर्गत भागातील वाहतूक व्यवस्थेचा पुरता बोजबारा उडाला. नाणीज पीठाचे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांच्या गंगापूजनावेळी आयोजित शोभायात्रेत हजारो भाविक सहभागी झाले तर राजस्थान येथील संत सेन महाराजांची शोभायात्रा पंचवटीतून साधुग्रामपर्यंत काढण्यात आली. या शोभायात्रांमुळे गोदा काठा सभोवतालच्या रस्त्यांवर निर्माण झालेली वाहतूक कोंडी दूर होण्यास काही तासांचा अवधी जावा लागला. एरवी, हजारो पोलिसांचा तैनात राहणारा ताफा शोभायात्रांच्या वेळी कुठे अंतर्धान पावला, याबद्दल स्थानिक नागरिक व वाहनधारकांनी आश्चर्य व्यक्त केले.
सिंहस्थातील परंपरेनुसार नाणीज् पीठाने शोभायात्रेचे आयोजन केले. तिन्ही आठ आखाडे व त्यांचे खालसे जगद्गुरूंना गंगापूजन व स्नानासाठी मिरवणुकीने घेऊन जातात. बुधवारी सकाळी या शोभायात्रेसाठी हजारो भाविक साधुग्राममध्ये दाखल झाले होते. त्यात महिलांचाही लक्षणीय सहभाग होता. सकाळी साधुग्राममधून शोभायात्रेला वाजतगाजत उत्साहात सुरुवात झाली. भगवा वेश परिधान करून भाविक त्यात सहभागी झाले. महाराष्ट्रातील विविध लोकसंस्कृती व कलांचे दर्शन घडविण्यात आले. शाही मार्गावरून ही मिरवणूक रामकुंडावर पोहोचली. भाविकांची संख्या इतकी मोठी होती की, प्रमुख साधू-महंत रामकुंडावर आले तरी मिरवणुकीतील भाविक मागे अतिशय लांब अंतरावर होते. त्याच दरम्यान मखमलाबाद नाका उदय कॉलनी येथून संत सेन महाराज यांची मिरवणूक निघाली. त्यातही दोन ते तीन हजार भाविक सहभागी झाले होते. दुपारी अडीचच्या सुमारास ही मिरवणूक साधुग्राममध्ये पोहोचली.
या शोभायात्रांमुळे गोदाकाठा सभोवतालचे छोटे-मोठे रस्ते, पंचवटी, दिंडोरी रोड, आडगाव नाका, सव्‍‌र्हिस रोड, दहीपूल, रविवार कारंजा आदी भागांतील वाहतूक व्यवस्था कोलमडली. काही ठिकाणी अर्धा ते एक तास वाहनधारक अडकून पडले. सिंहस्थामुळे सध्या सर्वत्र मोठय़ा प्रमाणात बंदोबस्त तैनात आहे. पण, या शोभायात्रेवेळी तुलनेत कमी मनुष्यबळ दिसले. यामुळे संथपणे चाललेल्या मिरवणुकीने अंतर्गत भागात कमालीची वाहतूक कोंडी झाली. त्यात मार्ग काढण्याचा प्रयत्न करणारे आणि आसपासच्या गल्लीबोळातून मार्ग शोधणाऱ्या वाहनधारकांमुळे आणखी भर पडली.