‘बाप्पा मोरया..’च्या जयघोषात बाप्पा भाविकांच्या घरात तसेच सार्वजनिक मंडळांत विराजमान झाले. त्यांच्या स्वागतासह आरासमध्ये कोणतीही कमतरता राहू नये यासाठी भक्तांनी आपल्या सृजनतेचा आविष्कार सादर केला आहे. दरवर्षीप्रमाणे डोंगर दऱ्यांची आरास, प्रदुषणाचा विळखा, गोदा प्रदुषण याची ओळख करून न देता शहर परिसरातील सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकण्यासाठी काही भक्तांनी घरगुती देखाव्यांत नाशिक-त्र्यंबक कुंभनगरीचे दर्शन घडविले आहे. यासाठी काही ठिकाणी भित्तीचित्रे तर काही ठिकाणी प्रत्यक्ष प्रतीकृतींचा वापर करण्यात आला आहे.
गुरूवारी ढोल ताशांच्या गजरात, कुठे सनईच्या मंजुळ स्वरात बाप्पा घरोघरी अकरा दिवसांच्या मुक्कामासाठी स्थानापन्न झाले. मुक्कामाच्या दिवसात त्यांना पृथ्वी तलावावरील विविध घडामोडींचा धावता परिचय करून देण्यासाठी मंडळ तसेच काही भाविक देखाव्याच्या माध्यमांतून अनेक विषयांना हात घालतात. त्यात घरगुती गणेशोत्सवही आघाडीवर आहे. यंदा घरगुती गणेशोत्सवावर कुंभमेळ्याची छाप असून शहरातील अनेक भक्तांनी आपल्या पध्दतीने कुंभमेळ्याशी निगडीत कलाकृती सादर केल्या आहेत. मखमलाबाद परिसरात वास्तव्यास असणाऱ्या गौरी पांडे आणि अंजु वाळवे यांनी रामकुंड परिसराचा देखावा साकारला आहे. रामकुंडा जवळील लक्ष्मण कुंड, सीता कुंड, वस्त्रांतर गृह, कुंडात आंघोळ करणारे भाविक-साधू गोदाकाठावरील लहान-मोठी मंदिरे, देवमामलेदार समाधी, आपत्कालीन सेवेसाठी उभ्या असलेल्या रुग्णवाहिका, तात्पुरते दवाखाने, जागोजागी सुरक्षेसाठी किंवा गस्तीवर असणारे पोलीस आदीचे प्रतिबिंब देखाव्यात उमटले आहे. हा संपुर्ण देखावा आकारास येण्यासाठी २० दिवसांहून अधिक कालावधी लागला. त्यासाठी थर्माकॉल, प्लाय, अन्य सजावटीचे सामान काही इलेक्ट्रीक साहित्याचा वापर करण्यात आला आहे.
कुंभमेळा सुखरूप पार पडावा, यासाठी यजमानपदाच्या भूमिकेत येत जगन्नाथाचा रथ ओढला आहे. या रथाचे नावकरी असलेले नगरसेवक माणिक सोनवणे यांनी आपल्या घरात नाशिकची कुंभ नगरी साकारली आहे. साधुग्राममध्ये प्रवेश करण्यासाठी उभारण्यात आलेले प्रवेशद्वार, द्वारावरील दोन दीपमाळ, मुख्य रस्त्यालगतचे जंगलीदास महाराज यांचा आत्मा मलिक संस्थेचा मंडप, समोरील बाजूस असलेले नारायण सेवा संस्थानचा मंडप यासह निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर -आखाडय़ांचे प्रवेशद्वार, प्रवेशद्वारा पासून काही अंतरावर डौलाने फडकणाऱ्या धर्मध्वजा, साधुग्राममधील छोटय़ा-छोटय़ा राहुटय़ा, लहान मोठय़ा रस्त्यांवरील वर्दळ आदीची प्रतिकृती सजावटकार नीलेश देशपांडे यांच्या संकल्पनेतून आकारास आली आहे. यासाठी दोन दिवसाहून अधिक कालावधी लागला.
चेतनानगर परिसरातील किरण कुलकर्णी यांनीे गणरायासमोर त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त तीर्थ परिसर प्लायवूड आणि अन्य साहित्याचा वापर करून साकारले आहे. कुशावर्त तीर्था सभोवताली पेशवेकालीन वास्तुशैलीत आकारास आलेले ‘ओरिया’, पिंपळाचा पार, त्याच्या समोर असलेले जिव्हेश्वर मंदिर, छोटेखानी हौद आणि सभोवतालचे वाडे यांची प्रतिकृती साकारली आहे. ही प्रतीकृती साकारण्यासाठी त्यांना आठ दिवसांचा कालावधी लागला. देखाव्यासाठी त्यांनी काही तांत्रिक गोष्टींचा आधार घेतला आहे. या तीर्थात भाविकांना हातपाय धुता येतील अशीही व्यवस्था करण्यात आली आहे.
घरगुती गणेशोत्सव सजावटीत कुंभमेळ्याचे प्रतिबिंब
‘बाप्पा मोरया..’च्या जयघोषात बाप्पा भाविकांच्या घरात तसेच सार्वजनिक मंडळांत विराजमान झाले.
Written by चैताली गुरवguravchaitali
Updated:
First published on: 22-09-2015 at 07:19 IST
TOPICSडेकोरेशन
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumbhmela decoration for home hanesha