नाशिक – पंचवटीतील सुनील वाघ हत्याकांड प्रकरणात न्यायालयाने कुंदन परदेशीला जन्मठेप ठोठावली. जुन्या वादातून झालेल्या या घटनेत सुनीलचा भाऊ हेमंतवरही जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रकरणात भाजप माथाडी विभागाचा जिल्हाध्यक्ष व्यंकटेश मोरे आणि याच पक्षाशी संबंधित राकेश कोष्टीसह अक्षय इंगळे, रवींद्र परदेशी, जयेश दिवे, किरण नागरे यांना सात वर्ष तर, गणेश कालेकरला दोन वर्ष कारावास सुनावण्यात आला. या खटल्यात १५ साक्षीदार फितूर झाल्यामुळे १० संशयितांची सुटका झाली. यात शिवसेना ठाकरे गटाशी संबंधित पदाधिकाऱ्याचा नातलग अजय बागूलचाही समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मखमलाबाद रस्त्यावरील क्रांतीनगर येथे मे २०१६ मध्ये ही घटना घडली होती. टोळक्याने भेळ विक्रेता सुनील वाघची दगडाने ठेचून हत्या केली होती. यावेळी सुनीलचा भाऊ हेमंतलाही मारहाण करीत जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणी उपरोक्त संशयितांसह मयूर कानडे, श्रीनिवास कानडे, मयूर भावसार, आकाश जाधव, अजय बोरीसा, अर्जुन परदेशी, पवन कातकाडे, रोहित उघाडे, अजय बागूल अशा एकूण २१ जणांविरुध्द पंचवटी पोलीस ठाण्यात खुनासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. संशयितांमध्ये अनेक सराईत गुन्हेगारांचा समावेश होता. त्यातील काहींचा शहरात टोळीयुध्द भडकण्यात सहभाग राहिल्याचे समोर आले होते. पोलिसांनी कुंदन परदेशी टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई केली. या टोळीची दहशत मोडून काढण्यासाठी संशयितांची पंचवटी परिसरात धिंडही काढण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण, उपनिरीक्षक व्ही. एस. झोनवाल यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

हेही वाचा >>>मालेगावात भरदिवसा तरुणाची टोळक्याकडून हत्या

मंगळवारी जिल्हा व सत्र न्यायाधिश बी. व्ही. वाघ यांनी आरोपींना शिक्षा सुनावली. त्यानुसार खुनाच्या गुन्ह्यात कुंदन परदेशीला जन्मठेप आणि ५० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात अक्षय इंगळे, रवींद्र परदेशी, जयेश दिवे, राकेश कोष्ठी, व्यंकटेश मोरे, किरण नागरे यांना सात वर्ष कारावास आणि प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड तसेच गणेश कालेकरला दोन वर्ष कारावास आणि तीन हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. १५ साक्षीदार फितुर झाल्यामुळे खूनाचा कट रचण्याच्या गुन्ह्यात १० संशयितांची सुटका झाली. खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून पंकज चंद्रकोर यांनी काम पाहिले. निकालाच्या पार्श्वभूमीवर, न्यायालयाबाहेर मोठी गर्दी झाली होती. काही आरोपी राजकीय पक्षांशी संबंधित असल्याने त्यांचे समर्थकही मोठ्या संख्येने जमल्याचे पहायला मिळाले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kundan pardeshi sentenced to life imprisonment in sunil wagh murder case nashik amy
Show comments