कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेतून ‘विजयासाठी कविता कधीच नव्हती माझी, म्हणून भीती नव्हती तिजला पराजयाची. जन्मासाठी हटून केव्हा नव्हती बसली, म्हणून नाही खंत तिला मरावयाची.’ असा दुर्दम्य आशावाद व्यक्त केला. त्यांच्या लेखणीने मराठी साहित्य विश्वात स्वतंत्र स्थान निर्माण केले. त्यांचा साहित्य प्रवास जगासमोर यावा, कुसुमाग्रजांची साहित्य संपदा सर्वासाठी खुली व्हावी, यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने सात वर्षांपूर्वी कुसुमाग्रज अध्यासनाची स्थापना केली. मात्र, आजवरच्या प्रवासात कार्यशाळा, काव्य-निबंध लेखन स्पर्धा, कुसुमाग्रजाच्या नावे पुरस्कार या उपक्रमांशिवाय अध्यासन आपला परीघ विस्तारू शकलेले नाही. या माध्यमातून वैचारिक मंथन अपेक्षित असताना अध्यासन त्यात काही आघाडी घेऊ शकले नसल्याचे अधोरेखित होते.
काही वर्षांपूर्वी इंग्रजी भाषेचा झालेला बोलबाला पाहता मराठीचे काय होणार, ही चिंता मराठी साहित्यप्रेमींना भेडसावत होती. मराठी साहित्य क्षेत्रात कुसुमाग्रजांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या साहित्याचा खजिना लेखणीतून उलगडला जावा यासाठी अध्यासनाची संकल्पना मांडली गेली. ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी आणि नाशिकच्या लाडक्या कुसुमाग्रजांचे यशोचित स्मारक व्हावे, या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी मुक्त विद्यापीठाने पुढाकार घेतला. साहित्य क्षेत्रातील नामवंताच्या उपस्थितीत २००९ मध्ये अध्यासनाचे उद्घाटन झाले.
अध्यासनाच्या माध्यमातून मराठी भाषा, साहित्य व संस्कृती संवर्धनासाठी शैक्षणिक उपक्रम राबविणे, काव्य, नाटय़ आणि ललित साहित्याच्या क्षेत्रातील सर्जनशील प्रतिभावंताचा यथोचित गौरव करणे, विविध वाङ्मयीन सेवा पुरविणे ही अध्यासनाची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली. तसेच अध्यासनाच्या वतीने प्रादेशिकतेची सीमा ओलांडत विविध भाषांमध्ये साहित्य लेखनात आपल्या लेखणीने स्वतंत्र ठसा उमटविणाऱ्या साहित्यिकास प्रती वर्षी एक लाख रुपये, सन्मानपत्र पुरस्कार दिला जातो. याशिवाय मराठी भाषेत विविध वाङ्मय प्रकारात लेखन करू इच्छिणाऱ्या नवलेखकांसाठी सर्जनशील साहित्यिनिर्मिती उद्बोधन व प्रशिक्षण वर्ग आयोजित करणे, लेखन स्पर्धा घेणे, सवरेकृष्ट साहित्यनिर्मितीला ‘विशाखा’ पुरस्काराने सन्मानित करणे आदी कार्यक्रमांची रूपरेषा ठरविण्यात आली.
प्रत्यक्षात अध्यासनाने सात वर्षांच्या कालावधीत केवळ कार्यशाळा, मराठी दिनानिमित्त निबंध लेखन-काव्य लेखन स्पर्धा, कुसुमाग्रजांच्या नावे पुरस्कार, विशाखा पुरस्काराचे वितरण या पलीकडे काही उपक्रम राबविले नाहीत. लोकबिरादरीसोबत अध्यासनाने घेतलेला महोत्सव आणि अच्युत पालव यांची कार्यशाळा त्यास अपवाद राहिली.
विद्यापीठाच्या अंदाजपत्रकात निधीची स्वतंत्र तरतूद असताना कुसुमाग्रजांचे साहित्य नाशिककरांपर्यंत पोहोचविण्याची तसदी अध्यासनाने घेतलेली नाही. ‘उठा उठा चिऊ ताई सारी कडे उजाडले.’ म्हणणाऱ्या कुसुमाग्रजांचा बोबड कवितांसह अन्य बालसाहित्य बहुतांश बालकांना ज्ञात नाही. ‘ग्रंथ पेटी’सह अध्यासन फिरते वाचनालय सुरू करू शकते. विद्यार्थ्यांमध्ये साहित्याचा जागर व्हावा यासाठी निबंध लेखनाच्या पलीकडे विचार झाला नाही. साहित्यप्रेमींच्या सृजनतेला निबंध, परिसंवाद, चर्चासत्र या पलीकडे आयाम देण्याचा प्रयत्न अध्यासनाने केल्याचे दिसत नाही. कुसुमाग्रजांच्या नावे साहित्याशी निगडित विविध स्पर्धा सुरू करीत नवीन पायंडा घातला जाऊ शकतो. मात्र मळलेली वाट सोडण्याची मानसिकता नसल्याने कुसुमाग्रज अध्यासनाचे कार्य एका परिघात सीमित राहिले आहे.
अधिकाधिक साहित्यप्रेमींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न
कुसुमाग्रज अध्यासन अधिकाधिक साहित्यप्रेमींपर्यंत पोहोचावे, यासाठी विद्यापीठाच्या दिनदर्शिकेतून अध्यासनाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली जाणार आहे. तसेच लवकरच सर्व विद्यापीठातील प्राध्यापक प्रतिनिधींना सोबत घेत विद्यार्थी कल्याण मंडळाची स्थापना करण्यात येईल. ज्या माध्यमातून परिसंवाद, चर्चासत्र होतील व वैचारिक मंथनाला वाव मिळेल. तसेच अन्य काही उपक्रमांची आखणी सुरू आहे.
– विनिता धारणकर , (प्रमुख, कुसुमाग्रज अध्यासन, मुक्त विद्यापीठ)