हिमाचलप्रदेश मधून गोळ्या नाशिक मध्ये
मालेगावमध्ये विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना
अमलीपदार्थ म्हणून युवा पिढी ज्या ‘कुत्ता गोळी’च्या आहारी गेली आहे, ती गोळी हिमाचल प्रदेशमधून जिल्ह्य़ात येत असल्याचा प्राथमिक अंदाज अन्न, औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. युवा पिढीला या नशेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी मालेगाव शहरात युद्धपातळीवर तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.
शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी या गोळीने नशेच्या आहारी गेले असून गोळीतील रासायनिक घटकांमुळे झोप येते, मेंदूवर परिणाम करणाऱ्या गोळीची सवय लागते. ‘कुत्ता’ नावाने ही गोळी युवा पिढीत परिचित आहे. ती गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून राज्यात छुप्या मार्गाने आणली जात असल्याचे उघड झाले आहे. परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या ‘अल्प्रोझोलम’ या झोपेच्या गोळ्यांना नशेबाज आणि विक्रेत्यांनी ‘कुत्ता गोळी’ हे सांकेतिक नामकरण केले आहे. नशेसाठी युवक पॉलीश, आयोडेक्स सारख्या वस्तूंचा वापर करीत असल्याचे यापूर्वी उघड झाले आहे.
मालेगावमध्ये अल्पवयीन मुलांकडेही ही गोळी सापडत असून पोलिसांनी या प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या गोळ्यांचा पुरवठा दोन-तीन ठिकाणांवरून होत असल्याचा तसेच शहरातील काही औषध दुकानांमधून त्याची विक्री होत असल्याचा संशय आहे. यामुळे पोलिसांनी अन्न-औषध प्रशासनाने औषध दुकानांची तपासणी करावी, अशी मागणी केली होती. या पाश्र्वभूमीवर, बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी अन्न, औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पाचारण केले. मालेगावमधील सर्व औषध विक्रेत्यांनी बैठक घेण्यात आली. तसेच काही दुकानांची तपासणी केली जात आहे. परंतु, औषध दुकानांमधून या गोळीची विक्री होत नसल्याचे स्पष्ट झाल्याचे या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
हिमाचलमधून या गोळयांचा पुरवठा होत असून त्या गुजरातमार्गे नाशिकमध्ये येत असल्याचा या विभागाचा अंदाज आहे. मालेगावमध्ये विशेष तपासणी मोहीम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी दिले.