जळगाव – मुकादमपदावरून दिलेली स्थगिती हटविण्यासाठी व त्याबाबतचा सहायक कामगार आयुक्तांकडे असलेल्या सुनावणीचा निकाल आपल्या बाजूने लावून देण्यासाठी तडजोडीअंती ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना येथील सहायक कामगार आयुक्त कार्यालयातील कामगार निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
तक्रारदार हे जळगाव शहरातील रहिवासी असून, ते माथाडी कामगार संघटनेचे उपाध्यक्ष तथा मुकादम म्हणून कार्यरत होते. तक्रारदारांना मुकादमपदावरून स्थगिती देण्यात आली होती. याबाबत सहायक कामगार आयुक्तांकडे सुनावणी सुरू आहे. या सुनावणीचा निकाल लावण्यासाठी कामगार निरीक्षक चंद्रकांत पाटील (५७, रा. वाघनगर, जळगाव) यांनी सुनावणीचा निकाल सहायक कामगार आयुक्तांना सांगून लावून देतो, असे सांगत तक्रारदारांकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी जळगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
हेही वाचा – अजित पवार यांच्यावर प्रकाशझोत; जनसन्मान यात्रेत ज्येष्ठ नेते, मंत्री भाषणापासून वंचित
हेही वाचा – सत्तेचा निर्णय महिलांच्या हाती! जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन
पोलीस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या सूचनेनुसार, तक्रारीच्या पडताळणीसाठी पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, एन. एन. जाधव, उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, हवालदार सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे यांच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी कामगार निरीक्षक पाटील यास तडजोडीअंती ३६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी पाटीलविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
© The Indian Express (P) Ltd