महापालिकेतील शिवसेनेचे माजी सभागृह नेते सुधाकर बडगुजर यांना लोकसभा निवडणुकीदरम्यान पोलिसांशी अरेरावी करुन शासकीय कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी बुधवारी न्यायालयाने दोषी ठरवित एक वर्ष, सहा महिने सक्तमजुरी सुनावली. शिक्षा सुनावण्यात आल्यावर लगेच त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.
हेही वाचा >>>नाशिक : बोराळे फाट्याजवळील अपघातात तीन जणांचा मृत्यू; मृतांमध्ये काका, पुतण्यांचा समावेश
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी सहायक पोलीस आयुक्तांवर बडगुजर यांनी अरेरावी करत शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत सुधाकर बडगुजर यांच्यासह ज्ञानेश्वर बडगुजर, राकेश शिरसाठ यांच्यावर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी बुधवारी जिल्हा न्यायालयात न्या. यु. जे. मोरे यांच्या उपस्थितीत सुनावणी झाली. सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने बडगुजर यांना शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने रवींद्र निकम यांनी कामकाज पाहिले.
पाच वर्षात १७ हजारांहून अधिक प्रकरणे
कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहचविण्याचे काम काही समाजकंटकांकडून होत आहे. २०११ ते २०१५ या कालावधीत राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ल्याची १७,६८२ प्रकरणे नोंदवली गेली. कायदा व सुव्यवस्थेसाठी अहोरात्र काम करणारे पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यावर झालेला हल्ला हा दुर्देवाने कायदा व सुव्यवस्थेवर हल्ला आहे. २०१४ लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सहायक आयुक्तांवर झालेला हल्ला, त्यापैकी एक, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
हेही वाचा >>>नाशिक : गिरणा गौरव पुरस्कार जाहीर; डॉ. रवींद्र कोल्हे, राजेश पाटील, कौशल इनामदार, ॲड. नितीन ठाकरेंसह ११ जणांचा समावेश
प्रकरण काय ?
२०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी अंबड येथील महापालिका विद्यानिकेतन शाळा क्रमांक चार केंद्रात मतदान सुरू असतांना संशयित ज्ञानेश्वर बडगुजर, राकेश शिरसाठ आणि सुधाकर बडगुजर यांनी निवडणूक काळात हत्यार बाळगण्यास मनाई असतानाही स्वत: जवळ गज, चाकु, चार प्लास्टिक दांडे असे साहित्य बाळगले होते. पोलिसांनी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केले. या बाबत विचारणा केली असता सहायक पोलीस आयुक्त राजपूत यांच्या अंगावर धावून जात अरेरावी केली. त्यांना ढकलून देत सरकारी कामात अडथळा आणला होता. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.