हर्षदा निकम

‘मेरी’तील १०० मोरांसमोर संकट

दिंडोरी रस्त्यावरील महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात ‘मेरी’च्या जागेत प्रदीर्घ काळापासून वास्तव्यास असणाऱ्या सुमारे १०० मोरांचा नैसर्गिक अधिवास प्रादेशिक न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेच्या विस्तारामुळे धोक्यात येणार आहे. प्रयोगशाळेचे विस्तारीकरण आणि निवास व्यवस्थेसाठी ‘मेरी’ आणखी चार एकर जागा देणार असून त्यामुळे राष्ट्रीय पक्ष्याच्या अस्तित्वावर संकट कोसळणार आहे. त्यांचे स्थलांतर करावे लागणार असून त्यामुळे नाशिकचे वैभव अस्तंगत होईल. हे टाळण्यासाठी मोरांचे वास्तव्य असणारे क्षेत्र वगळून प्रयोगशाळेसाठी दुसरी जागा द्यावी आणि वन विभागाने मोरांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे.

पंचवटीतील दिंडोरी रस्त्यावरून मार्गस्थ होताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला ‘मेरी’ची जागा असून तिथे वेगवेगळे विभाग कार्यरत आहेत. फुलेनगरसमोरील मेरीच्या जागेत १०० मोरांचे वास्तव्य आहे. धरणाचे नियोजन करताना ‘मेरी’कडून त्या त्या प्रकल्पाचे छोटेखानी स्वरूपात आराखडे तयार केले जातात. हे आराखडे करण्यासाठी या जागेचा वापर झाला आहे. राज्यातील बहुतांश धरणांचे आराखडे या ठिकाणी तयार झाले आहेत. या जागेचा दैनंदिन वापर कमी होतो. यामुळे वृक्षवेलींनी बहरलेल्या परिसरात मोरांचे अस्तित्व आहे. अनेकदा ते रस्त्यालगतच्या कुंपणापर्यंत बागडताना स्थानिकांना दिसतात. रस्त्यालगतची दीड एकर जागा ‘मेरी’ने काही वर्षांपूर्वी न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळेला दिली होती. ती अपुरी पडत असल्याने आता नव्याने चार एकर जागा दिली जाणार आहे. तिथे प्रयोगशाळा विस्तारीकरण आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची निवासस्थाने उभारण्याचे नियोजन आहे. या परिसरात मोरांचा नैसर्गिक अधिवास आहे. तिथे बांधकाम होऊन नागरी वावर वाढल्यास मोरांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागेल, अशी भीती व्यक्त होत आहे.

या जागेत जर प्रयोगशाळेचा विस्तार झाला, तर मोरांना अडचण होईल. मोरांना राहायला किंवा बागडायला पुरेशी जागा मिळाली नाही तर ते हा परिसर सोडून निघून जातील, याकडे पक्षीमित्र दिगंबर गाडगीळ यांनी लक्ष वेधले. चार एकर जागेत प्रयोगशाळा विस्तार आणि निवास संकुले उभारली गेली तर मोरांचे वास्तव्याचे क्षेत्र कमी होईल. त्यांना भ्रमंतीसाठी कमी जागा मिळेल. निवासस्थानांमध्ये वास्तव्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पाळीव कुत्री, मांजर यांचा त्यांना जाच होईल. मोरांचे वास्तव्य टिकवायचे असेल तर प्रयोगशाळेचे विस्तारीकरण त्या परिसरात होऊ नये, असे पक्षीमित्र चंद्रकांत दुसाने यांनी सांगितले.

संशोधन केंद्राद्वारे मोरांचे संवर्धन करा

राष्ट्रीय प्राणी असणारा मोर दुर्मीळ होत असून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी सर्वाची आहे. ‘मेरी’च्या जागेत मोठय़ा प्रमाणात झाडे असल्याने येथे ७० ते ८० मोरांचे वास्तव्य आहे. या परिसरात बांधकाम झाल्यास मोर मारले जातील. विस्तारीकरणामुळे त्यांना स्थलांतर करावे लागेल अथवा ते शहरात प्रवेश करतील. यामुळे त्यांच्यासमोरील संकट अधिकच वाढेल. मोर सहजासहजी कुठे वास्तव्य करत नाही. नाशिकचे हे भाग्य आहे की, काहीही न करता मोरांचे वास्तव्य तयार झाले आहे. ते तसेच राहावे याची जबाबदारी वन विभागाने स्वीकारावी. त्या ठिकाणी मोर संशोधन केंद्र सुरू करावे. सरकारने ही जागा वगळून अन्य जागा प्रयोगशाळेला द्यावी.

– आनंद बोरा (प्रमुख, नेचर क्लब ऑफ नाशिक)

विस्तारीकरणाचा मोरांना त्रास नाही

प्रयोगशाळेसाठी नेमकी कोणती जागा मिळणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. पण सध्या जी जागा चर्चेत आहे, त्या जागेपासून मोरांचे वास्तव्य बरेच दूर आहे. प्रयोगशाळेच्या विस्तारीकरणामुळे मोरांना कोणताही त्रास होणार नाही.

– बी. पी. मोरे  (सहसंचालक, विभागीय न्यायवैद्यक प्रयोगशाळा)

Story img Loader