मनमाड – शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविण्यात नगरपालिका प्रशासनाला अपयश येत आहे. बंद पथदिप, ढासळलेली आरोग्य व्यवस्था यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटातर्फे मंगळवारी नगरपालिका प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले.
पालिका प्रशासनाने उपरोक्त प्रश्नांची सोडवणूक न केल्यास यापुढे तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा देण्यात आला. जिल्हाप्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख माधव शेलार यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते. नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजे. शुद्ध पाणीपुरवठा झालाच पाहिजे, आदी घोषणांनी शिवसैनिकांनी पालिकेचा परिसर दणाणून सोडला.
हेही वाचा – नाशिककरांचे ‘तो राजहंस एक’ भारंगम नाट्य महोत्सवात, एनएसडीतर्फे विशेष निमंत्रित
प्रभाग क्रमांक पाचमधील काही भागात नऊ महिन्यांपासून पथदिव्यांसाठी खांब उभारण्यात आले. पण दिवेच लावण्यात आलेले नाहीत. त्यामुळे परिसरात अंधार असून रात्री रस्त्याने ये-जा करणे अवघड झाले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास होत आहे. अंधाराचा फायदा घेऊन महिला आणि मुलींची छेडछाड व सोनसाखळी खेचून नेण्याचे प्रमाण वाढले आहे. महिलांमध्ये भीतीचे वातावरण असल्याकडे मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले.
हेही वाचा – नाशिक : विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
शहरात सर्वत्र घाण आणि अस्वच्छता पसरली आहे. पालिकेकडून औषध फवारणी केली जात नसल्याने डासांचे प्रमाण वाढले. डेंग्यू, मलेरिया आजारांचे प्रमाण वाढत आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आंदोलकांनी निदर्शने केली. सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या दुर्दशेकडे लक्ष वेधले. आंदोलनात प्रमोद पाचोरकर, अशोक सानप, सनी फसाटे, जावेद मन्सुरी आदी सहभागी झाले होते.