पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सुटण्याची चिन्हे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंग देवीच्या गडावरील भवानी पाझर तलावाच्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या संदर्भात नाशिकच्या जलसंधारण विभाग कार्यकारी अभियंत्यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश प्राप्त झाला आहे. गडावरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्यास तलावाचे काम झाल्यावर मदत होणार आहे. या कामासाठी दोन कोटी ४९ लाख ७१ हजार रुपये मंजूर झाले आहेत.

गडावर वर्षांतून दोन वेळा म्हणजे नवरात्री व चैत्रोत्सवात यात्रा भरते. यात्रा काळात व इतर वेळेसही गडावर देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक हजेरी लावत असतात. पावसाळ्यात गडावर भरपूर पाऊस पडतो. गडावरील भवानी तलाव जुलै महिन्यातच तुडुंब भरून वाहू लागतो. परंतु, गळतीमुळे जानेवारीतच तलाव रिकामा होतो. परिणामी चैत्रोत्सवानंतर उन्हाळ्यात गडावर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासते. नागरिकांसाठी टँकरने पाणी विकत घ्यावे लागते. या तलावाच्या दुरुस्तीसाठी सप्तशृंग गडचे माजी उपसरपंच शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख गिरीश गवळी, ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालक मंत्री गिरीश महाजन, सचिव प्रवीण परदेशी यांच्याकडे पाठपुरावा करून तलावाच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी केली होती. त्यांच्या प्रयत्यांना यश येऊन तलाव दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे

गडाचे ग्रामपंचायत सदस्य राजेश गवळी यांनी तलावाच्या दुरुस्तीसाठी कळवण पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, लघुपाटबंधारे विभाग यांचे उंबरठे झिजवूनही उपयोग होत नसल्याने निधी मिळण्याची आशा सोडून दिली होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन सर्व हकीगत सांगितल्यावर त्यांनी जिल्हा नियोजन बैठकीत आपले निवेदन सादर करण्यास ग्रामपंचायतीला सांगितल्यावर काम मंजूर होण्याची आशा पल्लवित झाली. जिल्हा नियोजन बैठकीत निवेदन दिल्यानंतर आता प्रशासकीय मान्यता मिळाल्याने काम लवकरच सुरू होऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.