जळगाव – सध्या सगळीकडे पेरू, संत्री, मोसंबी आणि मेहरूणच्या बोरांचा हंगाम सुरू असताना शहरातील बाजारपेठेत कर्नाटकातील लालबाग आंबाही दाखल झाला आहे. नेहमीपेक्षा दोन महिने आधीच आंबा बाजारात आल्याने ग्राहकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. जळगावची केळी आणि मेहरुणची बोरे प्रसिध्द आहेत. सध्याचा हंगाम मेहरुणच्या बोरांचा असल्याने त्यांना महाराष्ट्रातून चांगली मागणी आहे. जळगावात ठिकठिकाणी हातगाड्यांवर मेहरुणची बोरे विक्रीसाठी असल्याचे दिसतात. पूर्वीपेक्षा मेहरुणच्या बोरांची आवक प्रत्येकवर्षी कमी होत असली तरी मागणी कायम आहे. मेहरुणची बोरे विशिष्ट चवीमुळे लोकप्रिय आहेत. आकाराने लहान असलेली ही बोरे सर्वांचे लक्ष वेधून घेतात. बाजारात संकरित बोरांचे अनेक वाण आले असले तरी मेहरुणची बोरे आपला दर्जा टिकवून आहेत. मेहरुणची बोरे बाजारात आल्यावर इतर फळांकडे ग्राहक दुर्लक्ष करुन मेहरुणच्या बोरांना पसंती देत असल्याचे दरवर्षी दिसून येते. यंदाच्या हंगामात मात्र त्यात काहीसा बदल झाला आहे. त्यास कारण ठरले ते हंगामाच्या दोन महिने आधीच बाजारात दाखल झालेल्या आंब्यांचे.
दरवर्षी साधारण फेब्रुवारी महिन्यात विविध जातीच्या आंब्यांची आवक सुरू होत असते. यंदा मेहरुणच्या बोरांची चर्चा सुरु असतानाच डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यातच बाजारात कर्नाटकातील लालबाग आंबा विक्रीसाठी दाखल झाला आहे. सध्या प्रत्येकी २० किलो वजनाच्या १०० ते १५० पेटी आंब्याची आवक जळगावमध्ये होत आहे. थंडीमध्येच आंबा बाजारात आला आहे. किरकोळ बाजारात त्यास २०० ते २४० रुपये किलोचा दर मिळत आहे. दर जास्त असले तरी ग्राहक गोड-आंबट चवीच्या लालबाग आंब्याच्या खरेदीसाठी थोडा खिसा रिकामा करताना दिसत आहेत. नेहमीपेक्षा बाजारात लवकर आलेल्या आंब्याची चव कशी लागते, याची उत्सुकता ग्राहकांमध्ये आहे. त्यामुळेच दर अधिक असले तरी ग्राहक आंबे खरेदी करत आहेत. या दिवसात आंबे विक्रीला आल्याचा ग्राहकांना विश्वासच बसत नाही. अनेक जण हातगाडीवर आंबे दिसत असले तरी फळ हातात घेऊन खरोखर आंबाच असल्याची खात्री करुन घेत आहेत.
हेही वाचा >>>उत्तर महाराष्ट्रात १३०० हेक्टरवरील पिकांचे पावसामुळे नुकसान
कर्नाटकातील लालबाग आंब्याची यंदा थोडी लवकर आवक झाली असली, तरी त्याच्यात गोडवा चांगल्यापैकी आहे. दुसरीकडे बाजारात सफरचंद सारख्या फळाचे दर आता १२० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ग्राहक लालबाग आंब्याच्या खरेदीला पसंती देत आहेत. – हाशीम बागवान (फळ विक्रेता, जळगाव)