अमली पदार्थ (एमडी) निर्मिती सहजपणे कुणाला शक्य नाही. एखाद्या तज्ज्ञाच्या सहकार्याशिवाय ते सूत्र मिळणे अवघड आहे. तस्कर ललित पाटीलने ते सूत्र कुठून मिळवले. त्याला कुणाचे सहकार्य लाभले, याचा सखोल तपास होणे गरजेचे असल्याचा मुद्दा सरकारी पक्षातर्फे शनिवारी जिल्हा न्यायालयात मांडण्यात आला. जिल्हा न्यायालयाने ललित पाटीलसह त्याच्या तीन साथीदारांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
हेही वाचा >>> जळगाव जिल्ह्यात पाण्यातून २९ मुलांना विषबाधा
अमली पदार्थ तस्करी प्रकरणातील मुख्य संशयित ललित पाटील (पानपाटील), रोहित चौधरी, झिशान शेख व हरिश पंत अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. मूळ नाशिकचा असणारा तस्कर ललित पाटीलच्या शिवसेना पक्षाशी व नेत्यांशी संबंधावरून सत्ताधारी-विरोधकांनी परस्परांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. पुण्याच्या रुग्णालयातून गायब झालेल्या ललित पाटीलला नंतर पोलिसांनी परराज्यात पकडले होते. मुंबई पोलिसांनी नाशिक शहरालगतच्या शिंदे गावात अमली पदार्थांचा कारखाना उध्द्वस्त केला होता. नंतर नाशिक पोलिसांनी याच गावात कारवाई करीत गोदामातून कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त केले होते. या प्रकरणात तस्कर ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटीलसह १२ जणांचा सहभाग समोर आला. संबंधितांवर यापूर्वीच मोक्कांन्वये कारवाई झाली आहे.
हेही वाचा >>> निर्यात बंदीमुळे कांदा गडगडला; लिलाव बेमुदत बंद, चांदवडमध्ये आंदोलकांवर लाठीमार
मुंबई, पुणे पोलिसांनंतर नाशिक पोलिसांनी ललित पाटीलसह त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले. शनिवारी त्यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने अमली पदार्थ निर्मिती ही सर्वसाधारण व्यक्तीचे काम नसल्याचा मुद्दा मांडला गेला. तज्ज्ञाच्या मदतीशिवाय ते सूत्र मिळू शकत नाही. ललित पाटीलने हे सूत्र कसे मिळवले, त्याला कुणाचे आर्थिक पाठबळ मिळाले, याचा सखोल तपास करण्यासाठी १० दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. बचाव पक्षाने पोलीस कोठडीला विरोध केला. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने ललित पाटीलसह अन्य तीन साथीदारांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सरकारी पक्षाच्या वकिलांनी दिली. याच प्रकरणातील एक संशयित शिवाजी शिंदे याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यालाही न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने शिंदेला न्यायालयीन कोठडी सुनावली.