लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : मनमाड ते इंदूर रेल्वे मार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया आता नाशिक जिल्ह्यातही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने उपजिल्हाधिकारी (भूसंपादन, वैतरणा जलविद्युत प्रकल्प) रवींद्र भारदे यांची नियुक्ती केली आहे. एकूण ३०९ किलोमीटरच्या या रेल्वे मार्गात साधारणत: १४० किलोमीटरचा मार्ग महाराष्ट्रात आहे. धुळे जिल्ह्यात आधीच भूसंपादन सुरू झाले आहे. आता नाशिकच्या नांदगाव आणि मालेगाव तालुक्यात रेल्वे मार्गासाठी १२० हेक्टरहून अधिक जागा संपादित केली जाण्याची शक्यता आहे.

अनेक वर्षांपासून रखडलेल्या मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाला भूसंपादनामुळे चालना मिळण्याची शक्यता आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीने १८ हजार ३६ कोटी रुपयांच्या या प्रकल्पास मंजुरी दिली होती. या माध्यमातून महाराष्ट्र व मध्य प्रदेश या दोन्ही राज्यातील अविकसित भाग देशातील अन्य भागांशी रेल्वे मार्गाने जोडले जाण्यास मदत होईल. मनमाड-मालेगाव-धुळे-नरडाणा-शिरपूर-महू-इंदूर असा हा रेल्वेमार्ग आहे. यातील महाराष्ट्रात साधारणत: १४० किलोमीटर अंतराचा मार्ग असेल. यामध्ये धुळे आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे. धुळे जिल्ह्यात नरडाणा, शिरपूर भागात भूसंपादन सुरु झाले आहे.

आणखी वाचा-इगतपुरी तालुक्यातील अपघातात कल्याणचे तीन जण ठार, दोन जखमी

नाशिक जिल्ह्यात या प्रक्रियेबाबत रेल्वे प्रशासनाने विचारणा केली होती. जिल्हा प्रशासनाने भूसंपादन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन, वैतरणा जलविद्युत प्रकल्प) रवींद्र भारदे यांचे नाव निश्चित केले. याबाबतची माहिती रेल्वे मंत्रालयास दिली गेली आहे. नाशिकचा विचार करता नांदगाव, मालेगाव या दोन तालुक्यांत रेल्वे मार्गासाठी भूसंपादन होणार आहे. सुमारे १२० हेक्टरहून अधिक जागा संपादित करण्याची शक्यता वर्तविली जाते.

रेल्वे मार्गाचे महत्व

मनमाड-इंदूर हा रेल्वेमार्ग केवळ रेल्वेच्याच फायद्याचा नव्हे तर, सर्वांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. या मार्गावर यंत्रमागचा मोठा व्यवसाय असून व्यावसायिकांना माल वाहतुकीचे स्वस्त साधन उपलब्ध होऊ शकते. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग हा वाहतुकीसाठी उत्तम साधन ठरणार आहे. कृषि मालाची रेल्वेने अतिशय स्वस्तात वाहतूक होऊ शकते.

Story img Loader