लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : अमर रहे…, अमर रहे… वीर जवान विनोद पाटील अमर रहे…च्या घोषात रविवारी रोटवद (ता. धरणगाव) येथे वीर जवान विनोद शिंदे- पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्यात आला.
भारतीय सैन्यदलात अहमदाबाद (गुजरात) येथे कर्तव्य बजावत असताना जवान विनोद जवरीलाल शिंदे- पाटील (३९) यांना १८ नोव्हेंबर रोजी वीरमरण आले. पार्थिव रविवारी सकाळी रोटवद गावात आणण्यात आले. त्यानंतर सजविलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यानिमित्त ग्रामस्थांनी अंगणात रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शालेय विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन अमर रहे…, अमर रहे….. वीर जवान विनोद पाटील अमर रहेसह भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणा देत होते.
आणखी वाचा-जळगावात ॲड. प्रवीण चव्हाण यांच्यासह पाच जणांविरुद्ध खंडणीप्रकरणी गुन्हा
वीर जवान विनोद पाटील यांचे पार्थिव अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आल्यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रतापराव पाटील, एरंडोल येथील प्रांताधिकारी मनीष गायकवाड, तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, गटविकास अधिकारी सुशांत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील, रोटवदचे सरपंच सुदर्शन पाटील, पोलीसपाटील नरेंद्र शिंदे यांच्यासह मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पोलीस दलाच्या तुकडीने हवेत गोळीबाराच्या तीन फैरी झाडत मानवंदना दिली. सैन्यदल व माजी सैनिकांनीही वीर जवानास अभिवादन केले. वीर जवान पाटील यांचा मुलगा आदित्य यांनी मुखाग्नी दिला. पालकमंत्री पाटील यांनी, विनोद पाटील यांच्या कुटुंबीयांस राज्य शासनातर्फे सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली.
जवान विनोद पाटील हे धरणगाव तालुक्यातील रोटवद येथील मूळ रहिवासी होते. ते गेल्या ११ वर्षांपासून सैन्यदलात होते. सध्या ते अहमदाबाद सैनिक दलाच्या शिबीरात नवीन भरती झालेल्या जवानांना प्रशिक्षण देण्याचे काम करत होते. त्यांचे वडील शेती करतात. त्यांच्यामागे वडील जवरीलाल शिंदे, आई जनाबाई, पत्नी माधुरी, मुलगे आदित्य आणि हर्षल, भाऊ प्रमोद असा परिवार आहे. वीर जवान विनोद पाटील हे दिवाळीला घरी आले होते. त्यांनी लक्ष्मीपूजन रोटवदला केले. नंतर भावाकडे अंकलेश्वर येथे भाऊबीज करून ते कर्तव्यावर हजर झाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना कर्तव्यावर असताना वीरमरण आले.