त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा बनाव चौकशी समितीच्या अहवालात उघड झाल्यानंतर तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथील मंदिरात शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ गेल्या वर्षी ३० जून रोजी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा बर्फाचा थर जमा होणे दैवी संकेत, चमत्कार असल्याचे भासवण्यात आले. सदर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेक भाविकांनी आस्थेने दर्शनासाठी त्र्यंबकेश्वर येथे धाव घेतली होती. मात्र या व्हिडिओच्या सत्यतेबद्दल शंका उपस्थित होत होत्या. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी या घटनेची दखल घेऊन घटनास्थळावर जाऊन पाहणी केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंदिर प्रशासनानेही या व्हिडिओची पुष्टी केलेली नव्हती. मंदिर प्रशासनातर्फे या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. या समितीच्या चौकशीत एक पुजारी तसेच त्याचे दोन सहकारी यांनीच हा बर्फ शिवलिंगावर ठेवल्याचे निष्पन्न झाल्याने या तिघांविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या पुजारी तसेच त्याच्या सहकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी संशयितांविरुद्ध जादूटोणा विरोधी कायद्याची कलमे लावण्याची मागणी अंनिसने केली आहे. या संदर्भात सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असूनही गुन्हा दाखल करण्यास सात महिन्यांचा वेळ का लागला? असाही प्रश्नही अंनिसने उपस्थित केला आहे. अंनिसच्या वतीने जिल्हाधिकारी, नाशिक, त्र्यंबकेश्वर पोलीस निरीक्षक यांना वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी या प्रकरणाबाबत बोलत असताना म्हणाले की, ३० जून २०२२ रोजी शिवलिंगावर बर्फ जमा झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो व्हिडिओ बनवाट असावा, अशी आमची दाट शंका होती. कारण चमत्कार होऊ शकत नाही, होणारही नाही. यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन यातले सत्य बाहेर यावे, अशी मागणी आम्ही लावून धरली होती. आता गुन्हा दाखल झाला असला तरी यासाठी सात ते आठ महिने का लागले? असा सवाल कृष्णा चांदगुडे यांनी उपस्थित केला.

या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, ३० जूनच्या घटनेची चौकशी करण्यासाठी मंदिर प्रशासनानेही चौकशी समिती नेमली होती. तसेच यात कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी आमच्याकडे पत्र प्राप्त झाले होते. आम्ही चौकशी करत असताना मेट्रोलॉजिकल विभागाचा अहवाल देखील आम्हाला मिळाला. ३० जून २०२२ रोजी वातावरणाच्या परिस्थितीनुसार याठिकाणी बर्फ जमू शकत नाही, असा अहवाल मिळाला होता. त्यानंतर आम्ही कारवाई करुन तीन पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आम्ही ताब्यात घेतलेले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Layer of ice accumulates on shivling in trimbakeshwer viral video are fake three priest arrest kvg