मालेगाव : मालेगाव शहराचा ‘मिनी पाकिस्तान’ असा उल्लेख करणारे भाजप आमदार नीतेश राणे हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. मालेगावबद्दलचे राणे यांचे विधान हे धार्मिक भावना दुखावणारे आणि शहराची बदनामी करणारे असल्याचा आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगरप्रमुख व माजी आमदार आसिफ शेख यांनी राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. शहरवासीयांची माफी न मागितल्यास राणे यांच्या विरोधात फौजदारी खटला दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालेगाव शहरात वीज वितरणाचा ठेका असणाऱ्या खासगी कंपनीने वर्षभरात काही ग्राहकांविरोधात वीज चोरीबद्दल कारवाया केल्या आहेत. शहरात वर्षभरात जवळपास ३०० कोटीची वीज चोरी झाल्याचा संबंधित कंपनीचा संशय आहे. हा संदर्भ देत आमदार राणे यांनी गेल्या आठवड्यात माध्यमांशी बोलताना मालेगाव हे मिनी पाकिस्तान असल्याचा उल्लेख करत वीज चोरीतील पैशांचा वापर लव्ह जिहाद सारख्या प्रकरणांमध्ये केला जात असल्याचे विधान केले होते. या विधानाची शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटली असून सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. वीज चोरीसंबंधी ज्या कारवाया करण्यात आल्या, त्यात दोन्ही समाजाच्या वीज ग्राहकांचा समावेश आहे, याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे.

हेही वाचा…धुळे जिल्ह्यातील सात जणांना जन्मठेपेचे कारण काय ?

आसिफ शेख यांनी ॲड. ए. ए. खान याच्यामार्फत राणे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. राजकीय कारणांमुळे मालेगावला जातीय दंगलीचा इतिहास असला तरी अनेक वर्षांपासून येथे दंगल झालेली नाही. हिंदू- मुस्लिम समाजामध्ये सलोखा कायम आहे. मालेगाव येथे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मुस्लिम समाज वास्तव्यास आहे. फाळणीनंतर पाकिस्तानात न जाता हा समाज भारतात राहिला. या समाजाचा पाकिस्तानशी कुठलाही संबंध नाही. असे असताना विशिष्ट धर्माला लक्ष्य करत राणे हे शहरातील दोन्ही समाजांची बदनामी करत आहेत. तसेच धार्मिक भावना दुखावण्याचे काम करत असल्याची तक्रार शेख यांनी या नोटीसीत केली आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Legal notice to mla nitesh rane over as malegaon mini pakistan statement psg