लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : शहर परिसरात बिबट्याचे दर्शन सातत्याने होत असतांना नाशिककर बिबट्याच्या दहशतीखाली आहे. गुरूवारी पाथर्डी परिसरात पहाटेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाल्याने वनविभागासह नागरीकांनी सुटकेचा श्वास सोडला.
गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी परिसरातील मळे परिसरात बिबट्याचा वावर असल्याची तक्रार परिसरातील नागरीक करत होते. हा परिसर वर्दळीचा असल्याने विद्यार्थी, नोकरदार, महिला अन्य नागरीक यांना सातत्याने या परिसरातून ये जा करावी लागते. वनविभागाने नागरीकांच्या तक्रारीची दखल घेत परिसराची पाहणी केली असता बिबट्याचा पावलाचे ठसे आढळले. त्यानुसार तीन दिवसांपूर्वी पाथर्डी परिसरातील नवले यांच्या मळ्यात वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला.
आणखी वाचा-मालेगाव : अद्वय हिरेंना न्यायालयीन कोठडी, जामीनाचा मार्ग आता मोकळा
गुरूवारी पहाटेच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. ही माहिती परिसरातील नागरीकांनी वनविभागाला देताच पथक घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला सुरक्षित रित्या ताब्यात घेतले आहे. बिबट्या नर असून सहा वर्षाचा असल्याची माहिती वनअधिकारी अनिल अहिरराव यांनी दिली. त्याच्या वैद्यकीय तपासणी नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.