लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: चांदवड तालुक्यातील मेसनखेडे खुर्द शिवारात रात्रीच्या वेळी शिकारीच्या शोधात फिरणारा सात ते आठ वर्षांचा बिबट्या वाहनाच्या धडकेने ठार झाला. या बिबट्यावर चांदवड वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती वन अधिकारी प्रकाश सोमवंशी यांनी दिली.
मेसनखेडे खुर्द शिवारात वन विभागाचे क्षेत्र आहे. तसेच डोंगर परिसर असल्याने या ठिकाणी बिबट्याचा अधिवास आहे. दोन दिवसांपूर्वी एक सात ते आठ वर्षाचा बिबट्या रात्रीच्या वेळी वाहनाच्या धडकेने मृत्यूमुखी पडला. शनिवारी सकाळच्या सुमारास वनमजूर नामदेव पवार हा फेरफटका मारीत असताना त्याला बिबट्या मयत दिसला. या घटनेची माहिती वनमजुराने तालुका वन अधिकारी संजय वाघमारे, वनपाल प्रकाश सोमवशी यांच्यासह वनरक्षकांना दिली. पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत शव चांदवडला आणले. यावेळी शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव आहेर, डॉ. मयूर विसपुते, डॉ. अश्विनी चापले यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले. त्यांनतर वन कार्यलयाच्या आवारात चांदवडचे सहायक वन संरक्षक सुजित नेवसे यांच्या मार्गदर्शनाखाली अंत्यसंस्कार करण्यात आले.