लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: नाशिकरोड परिसरात बिबट्यांचा वावर वाढला असून पळसे येथील जुना नाशिक साखर कारखाना रस्त्यालगत असलेल्या एका घराच्या अंगणात बिबट्या येऊन गेल्याचे सीसीटिव्हीमध्ये दिसून आल्याने नागरिकांमध्ये घबरात पसरली आहे.
नाशिक साखर कारखाना रस्त्यालगत दीपक गायधनी यांचे घर आहे. या घराच्या परिसरात मध्यरात्री बिबट्या येऊन गेला. रस्त्यावरील वाहनाच्या प्रकाशामुळे बिबट्या पळून गेला. सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा वावर दिसून आला आहे. नाशिकरोड तसेच पंचक्रोशीत काही दिवसांपासून बिबट्याचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास येत आहे.
हेही वाचा… जळगाव : शाळेतून आईसोबत घरी जाणार्या बालिकेला भरधाव डंपरची धडक
काही दिवसांपूर्वी नाशिकरोड परिसरातील आनंद नगरात एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला होता. हल्ल्यात ती व्यक्ती जखमी झाली होती. अलिकडेच रेल्वेची धडक बसून मादी बिबट्याचा मृत्यू झाला. बिबट्याचा या परिसरातील वाढता वावर पाहता रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी होत आहे.